प्रयागराज येथील मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

  • विद्यार्थ्यांना ‘ईद मुबारक’ म्हणण्याचा व्हिडिओ बनवण्यास सांगितल्याचे प्रकरण

  • अधिवक्ता अवधेश पांडे यांचा पुढाकार !

डॉ. बुशरा मुस्तफा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील झुंसी भागातील ‘न्यायनगर पब्लिक स्कूल’ या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेचे प्रांतमंत्री श्री. लालमणी तिवारी यांनी किडगंज पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या शाळेमध्ये ईदच्या वेळी विद्यार्थ्यांना कुर्ता, पायजमा आणि टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणण्याचा व्हिडिओ बनवून पाठवण्यास सांगण्यात आले होते. यामुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून तक्रार करण्यात आली होती.

येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अवधेश पांडे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ही धर्मद्वेष निर्माण करणारी घटना असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना पोलीस हिंदूंच्या संदर्भात अशी निष्क्रीयता दाखवत असतील, तर सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) त्यानंतर त्यांनी श्री. लालमणी तिवारी यांच्या माध्यमातून तक्रार केली. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून दोषी व्यक्तीच्या विरोधात योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रयागराज आणि झुंसी येथील धर्मप्रेमी नागरिकांनी अधिवक्ता अवधेश पाडे यांच्या प्रयत्नांवरून त्यांचे
अभिनंदन केले.

संपादकीय भूमिका 

अधिवक्ता अवधेश पांडे यांचे अभिनंदन ! असा प्रयत्न प्रत्येक अधिवक्त्याने करावा !