९० ते ९२ टक्के ठिकाणी मुंबईत सकाळची अजान झाली नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

  • अनधिकृत भोंगे बंद होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याची मनसेची भूमिका !

  • मौलवी ऐकत नसतील, तर त्या मशिदींपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा !

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे ४ मे या दिवशी ९० ते ९२ टक्के ठिकाणी मुंबईत सकाळची अजान झाली नाही. अजान न देणार्‍या मौलवींचे (इस्लामी धार्मिक नेत्यांचे) मी आभार मानतो की, त्यांना आमचा विषय समजला. हा विषय एक दिवसाचा नाही. ते (मुसलमान) त्यांचा धर्म धरून बसत असतील, तर आम्हालाही तसेच करावे लागेल. सणासुदीला ध्वनीक्षेपक लावणे समजू शकतो; मात्र ३६५ दिवस आम्हाला अजान ऐकवणार असाल, तर ती आम्हाला ऐकायची नाही.

महिला, विद्यार्थी, वृद्ध यांना त्याचा त्रास होतो. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का ? महाराष्ट्रातील भोंगे बंद झालेच पाहिजेत. ज्या मशिदींमधील मौलवी ऐकत नसतील, त्या मशिदींपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी, अशी रोखठोक भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

अजानला ३६५ दिवसांची अनुमती कशी ?

आम्हाला सणासुदीला काही दिवस अनुमती मिळते. यांना मात्र ३६५ दिवस अजान द्यायला अनुमती कशी दिली जाते ? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांसाठी नियमित अनुमती घ्यायला हवी आणि तिही ‘डेसिबल’च्या नियमाला धरून हवी. ‘केवळ ‘डेसिबल’ मोजण्याचे काम पोलिसांना आहे का ?’, असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

या वेळी राज ठाकरे म्हणाले,

१. आमच्या पदाधिकार्‍यांना पोलीस नोटिसा पाठवत आहेत. त्यांना कह्यात घेत आहेत. कारवाई केवळ आमच्यावर का ? जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना अटक; मात्र कायद्याचे पालन न करणार्‍यांना मोकळीक, हे कसे ?

२. महाराष्ट्रात अनेक मशिदी अनधिकृत आहेत. या अनधिकृत मशिदींवर असलेले भोंगे अधिकृत आहेत, ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडची आहे. अनधिकृत मशिदींना अधिकृत परवाने कुणासाठी देत आहात ?

३. प्रार्थना करायची असेल, तर मशिदीमध्ये करा. त्यासाठी ध्वनीक्षेपक कशाला लागतो ? तुम्ही हे कुणाला ऐकवत आहात ? जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील.

मुंबईत बांग देणार्‍या १३५ मशिदींवर पोलीस काय कारवाई करणार ?

मुंबईमध्ये एकूण १ सहस्र १४० मशिदी आहेत. ४ मे या दिवशी यांतील १३५ मशिदींतून पहाटे बांग दिली गेली, असा पोलिसांचा अहवाल आहे. ‘या मशिदींवर पोलीस कोणती कारवाई करणार ?’, असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

४. अनुमती घेऊन लावण्यात येणार्‍या भोंग्यांवरही ‘डेसिबल’च्या मर्यादापेक्षा अधिक आवाज असेल, तर आम्ही हनुमान चालिसा लावणारच.

५. हा विषय धार्मिक नाही; मात्र याला धार्मिक रंग दिलात, तर आम्हीही धार्मिक पद्धतीने उत्तरच देऊ. कायदा सुव्यस्थेचा विचार भोंग्यांवरून अजान देणार्‍यांनी करावा. आम्ही कुणाला प्रार्थना बंद करण्यास सांगितलेली नाही. धर्म आपल्या घरात असावा.

संपादकीय भूमिका

मुंबईतील ही घटना म्हणजे हिंदूंचे एकप्रकारे यशच म्हणावे लागेल. असे होणे हा हिंदू संघटित होत असल्याचा परिणाम आहे. हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, हे मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सर्वांनाच उघड झाले. हा संघटितपणा हिंदूंनी तसाच ठेवून हिंदु धर्मावरील सर्वच आघात परतवून लावायला हवेत !