मनसेचे पदाधिकारी भोंगे खरेदी करून पहिल्या टप्प्यात मशिदींसमोरील मंदिरांवरच भोंगा वाजणार !

संभाजीनगरसाठी पुणे येथून ५० भोंगे !

संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्यासाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भोंग्यांची खरेदी चालू केली आहे. शासनाने ३ मेपर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास पहिल्या टप्प्यात मशिदींसमोरील मंदिरांतच भोंगे लावण्याचे नियोजन आहे. शहरामध्ये बॅटरीवर चालणारे ५० अत्याधुनिक भोंगे आले आहेत. राज्यभरातही स्थानिक पातळीवर भोग्यांची खरेदी चालू आहे.

मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी चालू आहे. पदाधिकारी स्वव्ययातून भोंगे खरेदी करत आहेत. मशिदींसमोरील मंदिरांची सूची सिद्ध होत आहे. दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे लावण्यात येणार आहेत.

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, ‘‘भोंगे काढण्यासाठीच्या ३ मेपर्यंतच्या समयमर्यादेत राज्याने कारवाई न केल्यास नेमके काय करायचे ? याविषयी राज ठाकरे १ मे या दिवशी सभेत सांगतीलच. आमच्याकडेही यासाठी योजना ‘बी’, ‘सी’ नव्हे, तर ‘आर्’ म्हणजेच राज ठाकरे योजना सिद्ध आहे. साहेब सांगतील ते आम्ही करू.’’