महायुद्धाचे भयावह दुष्परिणाम !

पहिल्या महायुद्धाचे भीषण परिणाम !

संग्रहित छायाचित्र

वर्ष १९१४ ते १९१८ या काळात झालेल्या पहिल्या महायुद्धात पर्शिया (आताचा इराण), ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन आणि रशिया ही साम्राज्ये होत्याची नव्हती झाली. बेल्जियम आणि सर्बिया या राष्ट्रांना पुष्कळ हानी पोचली. एकूण ८० सहस्र ते १ लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, तर ६६ लाखांहून अधिक नागरिक ठार झाले. ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक घायाळ झाले. ७ लाख ५० सहस्र प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनॉनमध्ये केवळ दुष्काळामुळे मृत्यूमुखी पडले होते. एवढी हानी यापूर्वी झाली नव्हती.

दुसऱ्या महायुद्धाचे भयावह परिणाम !

वर्ष १९३९ ते १९४५ या काळात युरोप आणि आशिया मध्ये मित्र राष्ट्रे (रशिया, ब्रिटन, अमेरिका, चीन) अन् अक्ष राष्ट्रे (जपान, जर्मनी, इटली) यांच्यात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा जगाने पाहिली. दुसऱ्या महायुद्धात ८ कोटी ५० लाखांहून अधिक सैनिक आणि नागरिक यांचा मृत्यू झाला. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काही युद्धग्रस्त होतेच, तर काहींना त्याचे परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड, रशिया आणि जपान यांमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई आक्रमणांमध्ये संपूर्णपणे बेचिराख झाली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले, त्या वेळी ब्रिटनला पहिल्या ४ दिवसांतच १३ लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. ज्या वेळी जर्मनीने रशियालाही कोंडीत पकडले होते, त्या काळात रशियन जनतेला झाडपाला आणि लाकडाच्या भुशाचे केक खाऊन पोट भरावे लागले.