नागरिकांनो, युद्धकाळात कसे वागाल ?

लोकहो, देशात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्राप्रतीची कर्तव्ये पाळून राष्ट्रप्रेम व्यक्त करा !

१. शत्रूराष्ट्राने केलेले आक्रमण, त्या संदर्भातील देशाचे निर्णय आदींच्या संदर्भात अफवा पसरवणारी वृत्ते; भ्रमणभाषवरून शत्रूराष्ट्राला पूरक ठरणारे आलेले लघुसंदेश, चलचित्रे इत्यादी दुसर्‍यांना पाठवू नका !

२. शासनाची युद्धनीती वा सैन्याची हालचाल यांविषयी समाजात अकारण संभ्रम पसरवू नका; कारण त्याचा लाभ शत्रूराष्ट्र घेऊ शकते. युद्धप्रसंगी देशातील सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे इत्यादींनी सामंजस्याने वागून सैन्य आणि शासन यांना त्यांचे काम करू देणे, हेच राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

३. संचारबंदीच्या काळात घराबाहरे पडणे, उतावीळपणे राष्ट्राच्या सीमा ओलांडणे, शासनाने दिलेला ‘प्रकाशबंदी’चा (‘ब्लॅक आऊट’चा) आदशे मोडणे इत्यादी शासकीय नियमांचा भंग करणार्‍या कृती टाळा !

४. शत्रूराष्ट्राचे हस्तक (उदा. ‘स्लीपर सेल’ किंवा हेर) कोठेही कार्यरत असू शकतात. त्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती (उदा. अपरिचित व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसणे, शत्रूराष्ट्राने देशद्रोह्यांसाठी हत्यारे पाठवल्याचे कळणे) समजल्यास ती केवळ अधिकृत शासकीय अधिकारी किंवा पोलीस यांना कळवा !

५. सामाजिक संकेतस्थळे, प्रसारमाध्यमे आदींच्या द्वारे राष्ट्रभक्तीचा प्रचार करणे आणि आपल्या सैनिकांना पाठिंबा देणे, हे आपले राष्ट्रीय दायित्वच आहे !

लक्षात घ्या, ‘राष्ट्रनिष्ठ नागरिक’, हीच राष्ट्राची खरी शक्ती ! युद्धजन्य स्थितीत प्रत्येक नागरिक ‘सैनिक’ म्हणून कर्तव्यरत झाल्यास ते राष्ट्र विजयी होते !


नागरिकांनो, युद्धकाळात काटकसर आणि आज्ञापालन करून अन् संयम ठेवून संघटितपणे वागणे हे राष्ट्रकर्तव्यच ! नागरिकांनो, युद्धकाळात कसे वागाल ?

काटकसर आणि त्याग करणे !

भारतियांना शांततेच्या काळात युद्धाची सिद्धता करण्याचा अनुभव नाही किंवा तसे शिक्षण त्यांना देण्यात आलेले नाही आणि त्यांच्यावर तसे संस्कारही करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ‘युद्धाच्या वेळी आपण काही करायचे असते’, हेच त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे आता त्यांनी ते जाणून घ्यायला हवे. मुळात मोठ्या कालावधीचे युद्ध झाले, तर भारतियांना काटकसर करण्यासमवेत अनेक प्रकारचा त्याग करण्याची सिद्धता ठेवावी लागणार आहे, याची जाणीव त्यांनी आतापासून ठेवली पाहिजे. ऐन वेळी भारतावर युद्ध लादले गेले आणि ते बर्‍याच कालावधीपर्यंत चालू राहिले, तर ‘ते नागरिकांना सहन करता येणार नाही’, असे आताच्या त्यांच्या स्थितीवरून म्हणावेसे वाटते. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इंधनाचा वापर. भारतामध्ये इंधनाचे उत्पादन अपेक्षित तेवढे होत नाही. भारताला आखाती देशांकडून इंधन विकत घ्यावे लागते.

नियोजित युद्धकाळात तसा साठा करून ठेवता येतो आणि त्याचा काटकसरीने वापर करावा लागतो; मात्र अचानक आक्रमण झाल्यावर तशी कोणतीही सोय केलेली नसते. अशा वेळी देशात आहे ते इंधन सैन्याला प्राधान्याने द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांना इंधनाचा तुटवडा भासतो. त्या वेळी त्याकडे संयमाने पहावे लागणार आणि मिळणार्‍या इंधनाचा वापर काटकसरीने करावा लागेल. इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नधान्याचे वहन थांबू शकते. त्यामुळे तेही लोकांना मिळणे कठीण होऊ शकते. अशा वेळी ‘पैसे असूनही खाद्यपदार्थ मिळणार नाहीत’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

वीज आणि पाणी यांचा मर्यादित वापर करणे !

पाण्याचे वहनही इंधनावर चालवण्यात येणार्‍या पंपांद्वारे केले जाते, अशा वेळी पाण्याच्या वापरावरही मर्यादा येऊ शकते. विजेसाठी लागणार्‍या कोळशांचे वहन करण्यासाठी इंधन अल्प पडल्यास वीजनिर्मितीतही घट होऊ शकते. त्यामुळेही पाण्याच्या वापरासहित विजेचा वापरही मोजकाच करावा लागेल. त्यातही शत्रूने नद्यांवरील धरणांना लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केली, तर त्यावर अवलंबून असणार्‍यांवर मोठाच आघात होईल. ही स्थिती पहाता शांतताकाळात तलाव आणि विहिरी यांना वापरण्यायोग्य स्थितीत ठेवण्याची आवश्यकता असते. भारतातील गावांमध्ये हे साध्य होऊ शकते; मात्र सध्या देशातील मोठ्या महानगरांमध्ये, तसेच ‘स्मार्ट सिटी’मध्ये अशी सोय करणे आता अशक्यच आहे. त्यामुळे जी शहरे अशा धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांतील लोकांना शहर सोडण्याविना पर्यायच नसेल. शत्रूने वीजनिर्मिती केंद्रेच उद्ध्वस्त केली, तर आणखीच मोठा आघात होईल. दुसर्‍या महायुद्धात धरणे आणि वीजनिर्मिती केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने फ्रान्समधील काही भाग जिंकून घेऊन तेथील कारखान्यांमधून शस्त्रनिर्मिती चालू केली होती. त्यांना आवश्यक असणारी वीज धरणांच्या पाण्याद्वारे निर्माण करण्यात येत होती. तेव्हा फ्रान्सनेच स्वतःच्या; पण जर्मनीच्या कह्यात असणार्‍या या धरणांना स्वतःच उद्ध्वस्त केले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. रशियानेही जर्मनीतून माघार घेतांना त्यांच्या देशातील रस्ते, धरणे आदी उद्ध्वस्त केले होते.

प्रकाशबंदीचे (ब्लॅक-आऊट’चे) काटेकोर आज्ञापालन करणे !

युद्ध चालू असतांना रात्रीच्या वेळी प्रकाशबंदी केली जाते; दिवे असल्यास किंवा प्रकाश असल्याने शत्रूची विमाने देशात घुसल्यास त्यांना त्यांचे लक्ष्य शोधण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे रात्री दिवे लावून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. उन्हाळ्यात असे युद्ध झाले, तर पाणी आणि वीज यांच्या अभावामुळे किंवा तुटवड्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल आणि ‘असे युद्ध १ – २ वर्षे किंवा अधिक काळ चालले, तर काय स्थिती बिकट होऊ शकते’, हे लक्षात येईल.

आर्थिक समस्यांचा सामना करत समाजबांधवांना साहाय्य करून संघटित रहाणे !

या काळात रोजगाराची अनेक साधने बंद असतील आणि त्याचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर होईल. हा सर्वांत मोठा परिणाम असेल. अशा वेळी पूर्वी केलेल्या बचतीचा वापर करावा लागेल. ज्यांच्याकडे पर्याप्त स्वरूपात बचत नसेल, त्यांची प्रचंड ओढाताण होऊ शकते. त्यातही युद्ध अधिक काळ चालू राहिल्यास सरकार ‘बँके’तून मर्यादित पैसेच काढण्याचे निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत जगणे अधिक कठीण होईल. अशा वेळी सरकार आणि प्रशासन यांच्याकडून साहाय्य मिळण्याची अपेक्षा करता येत नाही. अशा वेळी नागरिकांनाच एकमेकांना, शेजार्‍यांना साहाय्य करावे लागणार आहे. त्यातही सीमेवर युद्ध करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रबंधुत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे या काळात सर्वांनी संघटित रहाणे आवश्यक असेल. अशा वेळी कणखर मानसिकता ठेवण्यासमेवत उपाशी रहावे लागण्याची सिद्धता ठेवावी लागणार आहे. त्यातही आजारी लोकांचे हाल अधिक होण्याची शक्यता असेल.

संकलक : श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २०१९)


जैविक आक्रमण झाल्यास किंवा संसर्गजन्य रोग पसरल्यास हे करा !

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

१. ‘विषाणूंच्या संसर्गापासून रक्षण होण्यासाठी सातत्याने जंतूनाशकाची फवारणी करावी आणि जंतूंचा नाश करावा.

२. रात्री झोपतांना मच्छरदाण्यांचा उपयोग करावा.

३. अंघोळीसाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी भरपूर पाण्याचा साठा करावा.

४. रोगाचा संसर्ग झालेल्या देशांमध्ये प्रवास करणे टाळावे.

५. आपण वापरत असलेल्या वस्तूंचा पृष्ठभाग १ टक्का ‘लायसोल’ या द्रावणाने निर्जंतुक करावा.

६. भरपूर झोप घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि पोषक अन्न ग्रहण करावे.

७. घसा दुखू लागल्यास अथवा खोकला असल्यास एक पेला (२०० मि.ली.) कोमट पाण्यात मीठ आणि हळद घालून त्या पाण्याने प्रत्येक ३-४ घंट्यांनी गुळण्या कराव्यात.

८. विषाणूंचा प्रसार झाल्याचे कळल्यावर घरातच रहा.

९. पालेभाज्या आणि अन्न खातांना काळजी घ्या. शिळे अन्न खाऊ नका.

– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


हवाई आक्रमण झाल्यास काय करावे आणि काय नको ?

काय करा

१. ‘शांत रहा, साहाय्य चालू करण्याआधी व्यवस्थित टेहाळणी करा.

२. पायर्‍यांजवळ असल्यास भिंतीजवळ जाऊन उभे रहा.

३. लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने पडझड थांबवा. त्यामुळे लोक घायाळ होणार नाहीत.

४. घायाळांच्या नाका-तोंडात गेलेली माती काढून स्वच्छ करा. त्यामुळे त्यांचा श्वासोच्छ्वास व्यवस्थित चालू राहील.

काय करू नका

१. घाबरून जाऊ नका.

२. पडझड झालेल्या भागातील लाकडे काढू नका. त्यामुळे आणखी पडझड होऊन घायाळ होण्याची शक्यता आहे.

३. लोंबकळणार्‍या वायरला हात लावू नका.

४. दगड-मातीच्या ढिगार्‍यावरून किंवा हानी झालेल्या जागेवर रांगत जाऊ नका.’

(संदर्भपुस्तिका : ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिका’, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र, सांगली, महाराष्ट्र.)


युद्धकाळात देशात काय पालट होऊ शकतात ?

१. खासगी कारखान्यांतून शस्त्रनिर्मिती

प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर आणि ते अधिक कालावधी चालू राहिले, तर शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासू शकतो. अशा वेळी सरकार सैनिकी कारखान्यांसह अन्य खासगी कारखान्यांतूनही शस्त्रांची निर्मिती चालू करू शकते. सैन्याला लागणारे शस्त्रांचे सुटे भाग येथे बनवण्यात येऊ शकतात.

२. रक्ताची आवश्यकता

युद्ध चालू झाले की, सैनिक मोठ्या संख्येने घायाळ होतात. त्यांना रक्ताची आवश्यकता असते. त्यासाठी सरकारकडून रक्तदानासाठी आवाहन करण्यात येते. या वेळी देशभक्त नागरिकांनी पुढाकार घेऊन ते दिले पाहिजे. रुग्णालयेही सैनिकांसाठी राखीव ठेवावी लागतात.

३. सैन्यभरती

सैन्यात भरतीसाठीही आवाहन करण्यात येते. अशा वेळी तरुणांनी त्याला प्राधान्य देऊन सैन्यात भरती होण्याची आवश्यकता असते. त्यातही या संदर्भातील प्रशिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाते.

४. प्रकाशबंदी

वर्ष १९७१ च्या युद्धाच्या वेळी मुंबईतही ‘ब्लॅक-आऊट’ करण्यात आले होते; कारण भारताच्या नौदलाने कराची बंदरावर प्रचंड आक्रमण केले होते. त्यामुळे पाककडून मुंबईला लक्ष्य करण्याची शक्यता होती.