नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२ ते २४ एप्रिल या कालावधीत लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होत आहे. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून सरकारी सेवेतून निवृत्त झालेले भारत सासणे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ‘साहित्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप नसावा’, असा साहित्यिक आणि लेखक यांचा आग्रह असतांनाही ९४ व्या अखिल भारतीय संमेलनाचे ‘स्वागताध्यक्षपद’ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले अन् समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. सर्वांत धक्कादायक प्रकार म्हणजे संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीची पूजाच डावलण्यात आली. एकूणच या संमेलनातून काय साध्य झाले ? अशा प्रश्नांचे ओझे घेऊन ९५ व्या संमेलनाध्यक्षांना ‘हे संमेलन किमान भाषिक उत्कर्षासाठी व्हावे’, यासाठीच झटावे लागेल !

सामान्यत: संमेलन हे वर्षातून एकदा होते; मात्र डिसेंबर २०२१ मध्ये संमेलन झालेले असतांना ५ मासांच्या आत दुसरे संमेलन घेण्याचा साहित्य महामंडळाचा अट्टहास अनाकलनीय आहे. त्यात भर उन्हाळ्यात आणि तेही उदगीरसारख्या अधिक उष्णता असलेल्या प्रदेशात संमेलन घेऊन महामंडळास काय साध्य करायचे आहे ? ‘जिथे तापमान ४०-४२ अंश सेल्सिअस असते, अशा रणरणत्या उन्हात मराठीजनांना दिवसभर बसणे शक्य होईल का ? ऐन तळपत्या उन्हात पुस्तक खरेदीसाठी मराठीजन जातील का ? यावर महामंडळाने कोणताच विचार केला नसेल’, असे म्हणणे धाडसाचे ठरेल !

नूतन संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांना ‘राजकारण्यांच्या अंकित असलेले संमेलन’, असा बसलेला शिक्का नाहीसा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल. संमेलन हे साहित्यजनांना न्याय देणारे, मराठीसाठी ठोस प्रयत्नशील असणारे, श्री सरस्वतीपूजनाची परंपरा परत चालू करण्याची संधी असलेले, असे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. गत संमेलनात सर्वच पुस्तक कक्षांवर मराठी भाषिकांची गर्दी होती आणि त्यातही आध्यात्मिक पुस्तके खरेदी करण्याकडे मराठी भाषिकांचा ओढा होता. तोच धागा पकडत सासणे यांना संमेलनाची विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी झटावे लागले. श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांना शरण गेल्यास ते निश्चित साध्य होईल !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर