नम्र, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तऱ्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६.२.२०२२ या दिवशी फोंडा, गोवा येथील बालसाधक चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याचा उपनयन संस्कार पार पडला. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर

१. नम्रता

कु. उत्कर्ष मोठ्यांचा आदर करतो. तो सगळ्यांशी नम्रतेने बोलतो. इतरांनी त्याला काही विचारले, तर तो त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देतो.

२. धार्मिक विधीची आवड

उत्कर्षच्या उपनयन संस्काराच्या वेळी सलग ३ दिवस धार्मिक विधी चालू होते. तो चंचल असल्याने एरव्ही एका जागी बसत नाही. धार्मिक विधी चालू असतांना मात्र तो शांत आणि स्थिर बसला. त्याने न कंटाळता आणि मन लावून सर्व विधी केले.

वैद्या (सौ.) मुक्ता अभिनय लोटलीकर

३. अन्य चलचित्रांपेक्षा पारंपरिक युद्धकला दर्शवणारी चलचित्रे आवडणे

उत्कर्षच्या वयाची मुले अधिकतः ‘व्हिडिओ गेम’ (संगणक अथवा भ्रमणसंगणक यांवर खेळण्यात येणारा चलचित्रांचा खेळ) खेळतांना दिसतात. उत्कर्षला त्यापेक्षा पारंपरिक युद्धकला दर्शवणारी चलचित्रे (व्हिडिओ) पहायला अधिक आवडतात. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचा चित्रपट पाहून कागदाची तलवार, भाले इत्यादी आयुधे बनवली आणि तो त्यांच्याशी एकटाच खेळत रहातो. वास्तविक त्याचे वडील त्याला महागडी खेळणी आणून देतात; परंतु स्वतः सिद्ध केलेल्या खेळण्यांशी खेळण्याकडे त्याचा ओढा अधिक असतो.

४. प्रेमभाव

प्रेमभाव हा उत्कर्षचा स्थायीभाव आहे. तो सर्वांशी लवकर जवळीक साधतो. त्याला भेटलेल्या व्यक्ती त्याची सतत आठवण काढतात. तो त्याच्या वयाच्या आणि त्याच्याहून लहान मुलांची पुष्कळ काळजी घेतो. तो कधीही लहान मुलांना दुखवत किंवा चिडवत नाही. त्याला अवतीभवती सतत माणसे लागतात. त्याची खेळणी कुणी मागितली किंवा कुणाला खेळायला दिली, तरीही त्याला आनंद होतो.

५. भाव

५ अ. देवतेप्रती भाव : एकदा घरातील जळमटे काढत असतांना घरातील एका सदस्याकडून गणपतीच्या प्रतिमेला केरसुणीचा स्पर्श झाला. ते पाहून उत्कर्षला पुष्कळ वाईट वाटले. त्याने त्या सदस्याला गणपतीच्या चरणी कान पकडून क्षमायाचना करायला सांगितली आणि मगच तो त्यांच्याशी बोलला.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : त्याच्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव आहे. तो त्याच्या कृतीतून व्यक्त होत असतो. ‘आश्रमात जातांना साधकांसाठी काहीतरी नेले पाहिजे’, असे त्याला वाटते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना एखादी गोष्ट आवडणार नाही’, हे त्याला उमजल्यास तो तसे करायचे टाळतो.

६. अनुभूती

नवग्रह होमाच्या ज्वाळांमध्ये ऋषींची आकृती दिसणे : उत्कर्षच्या उपनयन संस्काराच्या वेळी आमच्या घरी ‘नवग्रह शांती होम’ होता. त्या वेळी त्याला यज्ञकुंडाच्या ज्वाळांमध्ये एका ऋषींची आकृती दिसली. ‘ते ऋषी यज्ञात आहुती देत आहेत’, असे त्याला दिसले.

७. उत्कर्षचे स्वभावदोष

हट्टीपणा आणि आळस.

– वैद्या (सौ.) मुक्ता अभिनय लोटलीकर, फोंडा, गोवा. (उत्कर्षची आई) (५.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक   


यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.