दोन तपांची साधना !

विशेष संपादकीय

दैनिक सनातन प्रभातचा आज २३ वा वर्धापनदिन ! आर्थिक हानी सोसूनही गेले २३ वर्षे एखादे मराठी दैनिक चालू आहे, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥’

असे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात म्हटले आहे. समर्थांच्या याच वचनाचे आचरण करून सनातन प्रभात आज २४ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रूपात ‘सनातन प्रभात’ चालू झाले. ‘सनातन प्रभात नियतकालिक चालवणे, ही समष्टी साधना आहे आणि यातून ईश्‍वरप्राप्ती करून घ्यायची आहे’, या भावाने याची निर्मिती करणारे साधक सेवा करत आहेत. या दैनिकाला देशातील अनेक संतांचे आशीर्वाद लाभले अन् लाभत आहेत. याच आध्यात्मिक शक्तीद्वारे हे दैनिक आजही प्रकाशित होत आहे आणि पुढेही होत राहील, यात कोणतीही शंका नाही. मागील २ वर्षांतील कोरोनाच्या काळात काही दैनिके बंद पडली किंवा त्यांची पुष्कळ आर्थिक हानी झाली; मात्र याही काळात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू राहिले आणि आजही चालू आहे. ईश्‍वरी अधिष्ठान असेल, तर काहीही शक्य होऊ शकते, याचे ‘सनातन प्रभात’ हे एक उदाहरण आहे. ज्यांचा देवा-धर्मावर विश्‍वास नाही किंवा ज्यांची यावर श्रद्धा नाही, त्यांनाही ‘सनातन प्रभात’च्या वाटचालीचे आश्‍चर्यच वाटत असणार, यात आम्हाला तरी शंका नाही. ज्या उद्देशाने हे दैनिक काढण्यात आले होते, त्याचा मागोवा घेतला, तर ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ने १०० टक्के त्याचे कार्य पार पाडले आहे’, असेच म्हणावे लागेल. ‘हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मद्रोह्यांच्या विरोधात लढा यांसाठी साधकांनी आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक’ या ब्रीदवाक्यातच या दैनिकाच्या प्रकाशनाचा उद्देश स्पष्ट होतो. आज संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट आहे. आज हिंदू हे हिजाब, हलाल, हलाला, मशिदींवरील भोंगे आदींच्या विरोधात प्रखरपणे बोलत आहेत. अनेक राज्यांत आज हिंदुत्वाच्या विचाराचे समर्थन करणारी सरकारे आहेत; मात्र जेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, तेव्हा नेमकी याच्या उलट स्थिती होती. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदूंना जागृत करण्याचे कार्य चालू करण्यात आले होते. गेल्या २४ वर्षांत ‘सनातन प्रभात’ने जे विचार मांडले त्याच विचारांवर आज हिंदूंकडून कृती केली जात आहे, हे लक्षात घ्यायला हवे आणि हेच ‘सनातन प्रभात’चे यश आहे, असेच आम्हाला वाटते. जेव्हा भारतीय पत्रकारितेचा किंवा हिंदुत्वाच्या चळवळीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ‘सनातन प्रभात’चे नाव त्याच ठळपणे असेल, यात आम्हाला तरी शंका वाटत नाही.

संकटांवर मात करून कार्य चालू !

‘सनातन प्रभात’ची आतापर्यंतची वाटचाल निर्धोक होती, असे नाही. ‘सनातन प्रभात’वर काँग्रेस सरकारच्या काळात बंदीची टांगती तलवार होती. त्याही स्थितीत ‘सनातन प्रभात’ने हिंदुत्व, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचा घेतलेला वसा टाकला नाही. ‘सनातन प्रभात’वर काही खटलेही घातले गेले. संपादकांना ४ वेळा अटकही झाली, तरीही ‘सनातन प्रभात’ने त्याचे प्रखर आणि परखड विचार मांडण्याचे थांबवले नाही. इतकेच काय तर हिंदुत्वनिष्ठांच्या, त्यांच्या संघटनांच्या, पक्षांच्या चुकाही तितक्याच परखडपणे सांगितल्या; मात्र याचा अपलाभ पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी घेऊ लागल्याने आम्हाला ते हिंदूंच्या हितासाठी थांबवावे लागले; मात्र आम्ही आमचे विचार सोडलेले नाहीत कि त्याला तिलांजली दिलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पत्रकारिता ही तत्त्वनिष्ठतेनेच करणे आवश्यक आहे; कारण हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे. भारतीय पत्रकारितेचे अध्वर्यू बाळ गंगाधार टिळक यांनी ज्या परखडपणे आणि तत्त्वनिष्ठतेने इंग्रज सरकारवर वैचारिक आघात केले आणि भारतीय जनतेमध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण केला, तीच खरी पत्रकारिता होय आणि ‘सनातन प्रभात’ त्याच पत्रकारितेला आदर्श मानून गेली २३ वर्षे वाटचाल करत आहे. टिळक यांना त्यांच्या या परखड पत्रकारितेमुळे ६ वर्षे म्यानमारच्या (पूर्वीच्या ब्रह्मदेशाच्या) मंडाले येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली होती. ‘सनातन प्रभात’नेही अशा गोष्टींची कधी पर्वा केली नाही. सनातन प्रभातच्या पत्रकारितेमुळे अनेक आंदोलने झाली. पूर्वी हिंदूंच्या देवतांचा विज्ञापन, चित्रपट, नाटक आदींच्या माध्यमांतून अवमान केला जात होता, त्याला प्रखरपणे विरोध करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ने करण्यास चालू केल्यावर त्यातून आंदोलने झाली आणि शेकडो घटनांत हे अवमान रोखण्यात हिंदूंना यश आले. हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची काढलेल्या अश्‍लील चित्रांविषयी प्रथम ‘सनातन प्रभात’ने प्रखरपणे आवाज उठवला. यानंतर त्याचे देशपातळीवर आंदोलन झाले आणि हुसेन यांना देश सोडून पलायन करावे लागले अन् तेथे त्यांचा मृत्यू झाला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभ झाला, तेव्हा ‘ईश्‍वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेसाठी’ अशा प्रकारचे घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात येत होते. ‘सनातन प्रभात’चे हे अंतिम ध्येय आहे. ‘समाज आणि शासनकर्ते जर धर्माचरणी झाले, तर भारतात ईश्‍वरी राज्यच येईल’, या हेतूने ‘सनातन प्रभात’ हिंदूंना साधनेविषयी मार्गदर्शन करत आले आहे आणि करत आहे. सर्वच साधकवृत्तीच्या लोकांसाठी ‘सनातन प्रभात’मधील साधनेविषयीचे लिखाण त्यांच्या साधनेसाठी मार्गदर्शक ठरत आहे. हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते अन् हितचिंतक आज साधना करू लागले आहेत. काही जण अध्यात्मप्रसारही करत आहेत. अन्य कोणत्याही लाभापेक्षा ही गोष्ट ‘सनातन प्रभात’साठी अमूल्य अशी आहे. समाजात आज अनेक दैनिके आहेत, त्यातील बहुतांश दैनिके ही व्यवसाय म्हणूनच चालवली जातात. अशा दैनिकांमुळे राष्ट्र, धर्म आणि हिंदूंची साधना यांसाठी काही कार्य होत आहे, असे दिसत नाही. गेली अनेक दशके हिंदुत्वनिष्ठ, तसेच साधू-संत भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी चळवळ राबवत आहेत. ‘सनातन प्रभात’ही गेली २४ वर्षे त्यासाठी प्रयत्नरत आहे. आज अशी स्थिती आहे की, हे हिंदु राष्ट्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे ‘काळ’ हे कारण आहे; मात्र जेव्हा काळ प्रतिकूल होता, तेव्हापासून ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी हिंदूंना जागृत करत आहे. त्यांना ते कशा प्रकारे आणता येईल ?, हे हिंदु राष्ट्र कसे असेल ?, याचे मार्गदर्शन करत आहे. हिंदु राष्ट्रातील राज्यघटना, न्यायव्यवस्था, प्रशासन, शिक्षण, विकास आदींविषयी वेळोवेळी ‘सनातन प्रभात’मधून लिखाण प्रसिद्ध केले जात आहे. संतांनी सांगितल्यानुसार आणि भविष्यवेत्त्यांच्या म्हणण्यानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. तोपर्यंत ‘सनातन प्रभात’ यासाठी मार्गदर्शन करतच रहाणार आहे; मात्र तेथून पुढे ‘प्रत्यक्ष हिंदु राष्ट्रात कसे कार्य केले पाहिजे ?’, यासाठीही मार्गदर्शन केले जाईल. भारत हा आध्यात्मिक स्तरावर विश्‍वगुरु होता. त्याला पुन्हा त्याचा मान मिळवून दिला पाहिजे. यात ‘सनातन प्रभात’ खारीचा वाटा उचलत आहे. यामध्ये ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते आणि हितचिंतक यांचाही मोठा सहभाग आहे आणि असणार आहे. त्यामुळे या वर्धापनदिनी त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो !