रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम !
मॉस्को/कीव – रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मार्च मासामध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोचल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. ८ एप्रिल या दिवशी प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या मासिक अन्न किंमत निर्देशांकानुसार स्वयंपाकाचे तेल, धान्य आणि मांस हे सर्वकालीन उच्चांकावर पोचले. युद्धामुळे युक्रेनच्या बंदरांवरून होणारी आयात-निर्यात थांबली आहे. याच कारणास्तव गेल्या मासात अन्नधान्याच्या किमती १७ टक्क्यांनी वाढल्या. मार्चमध्ये जागतिक स्तरावर गव्हाच्या किमती १९.७ टक्क्यांनी वाढल्या, तर मक्याच्या किमतीत १९.१ टक्क्यांनी मासिक वाढ नोंदवली गेली. जव आणि ज्वारी यांच्या किमतींनीही विक्रमी उच्चांक गाठला.
Russia Ukraine War: इन जरूरी उत्पादों का खड़ा हो गया भारी संकट, दुनियाभर के लोगों के लिए होगी बड़ी चुनौती#RussiaUkraineWarLatestNewshttps://t.co/SpIcntZGzE
— ET Hindi (@ETHindi) March 25, 2022
गरीब देशांची स्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता !
‘अन्न आणि कृषी संघटने’च्या प्रवक्त्याने सांगितले, ‘‘ज्या देशांना आधीच संघर्ष, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक परिस्थिती यांसह इतर संकटांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी अन्नधान्यांच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ हा विशेष चिंतेचा विषय आहे.’’ यासमवेतच ते म्हणाले की, अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, जेथे अन्नधान्याचा तुटवडा आहे, त्यांना अन्नधान्यासाठी अधिक किंमत देणे कठीण होऊ शकते. याचा त्या देशांतील नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.