रशियावर तात्काळ कार्यवाही करा किंवा संघटनेला विसर्जित करा !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सुनावले !

संयुक्त राष्ट्रांनी जगातील एकतरी समस्या सोडवली आहे का ? भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेऊन ७४ वर्षे झाली आहेत; मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ‘झेलेंस्की यांना जे वाटते, तेच आता करण्याची आवश्यकता आहे’, अशी आता जगभरातून मागणी झाली पाहिजे. भारतानेही त्याला समर्थन दिले पाहिजे !

न्यूयॉर्क (अमेरिका) – रशियाकडून युक्रेनमध्ये नरसंहार केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘रशियाच्या आक्रमणाविषयी त्वरित कार्यवाही करा किंवा तुमची संघटना विसर्जित करा !’ या वेळी त्यांनी रशियाच्या आक्रमणात मृत झालेल्या युक्रेनमधील नागरिकांचे मृतदेह व्हिडिओच्या माध्यमांतून दाखवले.

रशियाचे सैनिक इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांसारखे !

झेलेंस्की पुढे म्हणाले, ‘‘रशियाचे सैनिक ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांपेक्षा वेगळे नाहीत. काल मी आमच्या बुचा शहरातून परतलो. रशियाच्या सैनिकांनी केला नाही, असा एकही गुन्हा येथे शिल्लक नाही. त्यांनी देशाची सेवा करणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांना हेतूपुरस्सर ठार मारले. घराबाहेर आलेल्या महिला साहाय्यासाठी ओरडत असतांना त्यांनाही ठार करण्यात आले. अनेक महिलांवर त्यांच्या मुलाबाळांच्या समोरच बलात्कार करून ठार करण्यात आले. रस्त्यांवरील वाहनांत जे नागरिक होते, त्यांना रशियाच्या रणगाड्यांनी चिरडून ठार केले. रशियाने केलेले हे गुन्हे दुसऱ्या महायुद्धातील क्रौर्यापेक्षाही भयंकर आहेत. रशियाच्या या अत्याचारांमुळे जागतिक सुरक्षेची संपूर्ण रचनाच अशक्त होत आहे. त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत.’’

युक्रेनमधील नरसंहाराचा भारताकडून निषेध !

झेलेंस्की यांनी केलेले युक्रेनमधील युद्धगुन्हेगारीचे वर्णन हे अत्यंत व्यथित करणारे असून त्याची नि:ष्पक्ष चौकशी करावी, या मागणीस आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका भारताकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली.