हिंदु नववर्षाचा प्रारंभ वीर सावरकरनिर्मित भगव्या ध्वजाची गुढी उभारून करा !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने केलेले आवाहन

मुंबई – देशातील १० राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत, असे धक्कादायक वास्तव केंद्र सरकारने न्यायालयात मांडले. त्यामुळे कधी नव्हे, इतके हिंदूंचे संघटन करणे आवश्यक झाले आहे. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सिद्ध केलेला हिंदु धर्मध्वज प्रभावी माध्यम आहे. सर्व हिंदूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर हिंदु धर्मध्वजाची गुढी उभारून नववर्षाचा प्रारंभ करावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा भगवा ध्वज दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे उपलब्ध आहे.

स्मारकाच्या वतीने म्हटले आहे की, तथाकथित निधर्मीतेमुळे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ‘हिंदूंचे अस्तित्व या देशातून संपुष्टात येणार की काय’, अशी भीती निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु धर्मध्वजामध्ये जी प्रतिके समाविष्ट केलेली आहेत, ती हिंदूंसाठी प्रेरक आहेत. ही त्यांच्यातील वीरतेचे दर्शक असून त्यांच्या संरक्षणाची शाश्वती देत आहेत. हिंदु धर्मध्वजाची गुढी उभारून वीरता, साहस आणि धर्माच्या प्रति निष्ठा दर्शवावी. यामुळे हिंदूंवर वक्रदृष्टी टाकणाऱ्यांसाठी चेतावणीही ठरेल. ‘शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो, धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो’, हे वीर सावरकर यांचे तत्त्व होते.