#Gudhipadva : VIDEO – गुढीपाडव्याचे अद्वितीय महत्त्व

१. गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व

अ. प्रजापति-संयुक्‍तलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणे

गणेशयामल या तंत्रग्रंथात ‘नक्षत्रलोकातील (कर्मदेवलोकातील) २७ नक्षत्रांपासून निघालेल्या २७ लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभाग) होऊन पृथ्वीवर २७ x ४ = १०८ लहरी येतात’, असे सांगितले आहे. त्यांच्या विघटनाने यम, सूर्य, प्रजापति आणि संयुक्‍त अशा चार लहरी होतात.

१. प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे, शरिरात कफप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

 २. यमलहरींमुळे पाऊस पडणे, वनस्पती अंकुरणे, स्त्रियांना गर्भधारणा होणे, गर्भाची व्यवस्थित वाढ होणे, शरिरात वायूप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

३. सूर्यलहरींमुळे भूमीची उष्णता वाढून वनस्पती जळणे, चर्मरोग होणे, भूमीची उत्पादनक्षमता न्यून होणे, शरिरात पित्तप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

४. संयुक्‍त लहरी म्हणजे प्रजापति, सूर्य आणि यम या तिन्ही लहरींचे मिश्रण. ज्या संयुक्‍त लहरींत प्रजापति लहरींचे प्रमाण जास्त असते, त्यांना प्रजापति-संयुक्‍तलहरी म्हणतात. अशाच रितीने सूर्य संयुक्‍त आणि यम संयुक्‍त लहरीही असतात.

परात्पर गुरु परशराम माधव पांडे

२. गुढी हे मानवी शरिराचे प्रतीक असणे

‘वीर्य बिजाचा आकार १ या अंकाप्रमाणे असतो. शरिरात डोके शून्याच्या आकारासारखे आणि मेरुदण्ड म्हणजे त्याची शेपटी (कणा) हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कळकाच्या काठीवर गडू ठेवून (मानवाकृती करून) त्याची पूजा करतात. काठी म्हणजे मेरुदण्ड आणि गडू म्हणजे मानवाचे डोके. कळकालाही आपल्या पाठीच्या कण्याप्रमाणे मणके असतात.’

– प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४७)

३. सणांचे चक्र

‘माघी पौर्णिमेपासून ‘उत्सृष्टा वै वेदाः ।’ असे म्हणून ब्राह्मणांनी वेदाभ्यास थांबवून शास्त्राभ्यास चालू केल्यानंतर समाजव्यवस्थेत पालट होऊन समता निर्माण होते. सर्व भेदाभेद, विधी-निषेध, उच्च-नीच भाव यांची होळी करण्यात या समानतेचा कळस होतो. परस्परद्वेष, मारामारी आणि रक्‍तपात यांची रंगपंचमी करण्यांत तिचा शेवट होतो. अशा वेळी या समतेचा कंटाळा येऊन पुन्हा नव्या व्यवस्थेचा आरंभ होतो, तो दिवस म्हणजे पाडवा.

अ. उत्पत्ती

‘नव्या व्यवस्थेचा आरंभ करण्याचा दिवस म्हणजे पाडवा. नुसता पाडवाच नव्हे, तर चैत्राचा पहिला पंधरवडाच व्यवस्थेचा पाया घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणालाही न आवडणारी; पण व्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी निःस्वार्थी सेवावृत्तीची स्थापना या पंधरवड्याच्या शेवटीपर्यंत होते.’

आ. स्थिती

‘सर्वत्र सुव्यवस्था लागून तिचा शेवट जिकडे तिकडे सुबत्ता आणि स्थैर्य निर्माण होण्यात होते. हे स्थैर्य दिवाळीपर्यंत रहाते.’

इ. लय

‘दिवाळीच्या वेळी पुन्हा द्यूत आणि चंगळ यांना आरंभ होऊन होळी अन् रंगपंचमीच्या वेळी पुन्हा सगळ्या गोष्टींचा शेवट होतो. असे हे मानवीवर्षातील उत्पत्ती-स्थिती-लय यांचे निदर्शक अशा सणांचे चक्र आहे.’

 ४. वार्षिक प्रलय संपून नवनिर्मितीला आरंभ होण्याचा दिवस

‘नित्य प्रलय, मासिक प्रलय, वार्षिक प्रलय, युग-प्रलय, ब्रह्मदेवाचा प्रलय, असे अनेक प्रलय आहेत. सर्वांची गती आणि स्थिती सारखीच असल्यामुळे ‘एकाचे वर्णन करतांना दुसर्‍याचे रूपक केले’, असे वाटते; पण तसे नाही. एक वार्षिक प्रलय संपून पुन्हा नवनिर्मिती चालू होण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसालाच ‘पाडवा’, असे म्हणतात.’

५. पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश

‘शिमग्याच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते. ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

६. चैत्र मासातील उन्हाळ्याचा त्रास होऊ नये; म्हणून घ्यावयाचे औषध

‘चैत्र मास उन्हाळ्यात येतो. या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये; म्हणून एक औषध सांगितले आहे. पाडव्याच्या दिवशी हे औषध सर्वांनी घ्यायचे असते. ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, त्यांनी नंतरसुद्धा हे औषध घ्यायला आडकाठी नाही.

पारिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः ।
सपुष्पाणि समानीय चूर्णं कुर्यादि्वधानतः ।।१।।

मरीचिहिंगुलवणमजमोदा च शर्करा ।
तिंतिणीमेलनं कृत्वा भक्षयेद्दाहशांतये ।।२।।

अर्थ : कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावे. जून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतो; म्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.

७. पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ

‘वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो; म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.

अ. पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.

आ. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण अल्प असेल, तर अशा वेळी विहिरी इत्यादींचा उपयोग व्हावा; म्हणून लागणारे पाट, ताली इत्यादी सर्व साहित्य नीट करून ठेवता येते.

इ. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करता येतो अन् येणार्‍या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते.

ई. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत इत्यादी आणून ठेवता येते.’

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि ते साजरे करण्याची पद्धत’

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष