विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याप्रकरणी भाजपचे आंदोलन चालू !  

राज्यभरात नोटिसीची होळी करणार !

मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राजकीय नेत्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रीत केल्याप्रकरणी ‘बीकेसी’तील सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याविषयी नोटीस पाठवण्यात आली आहे. या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची धग पुणे येथे चालू झाली आहे. आंदोलनाच्या वेळी भाजपच्या वतीने या नोटिसीची होळी करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळात राजकीय नेत्यांचे दूरभाष अनधिकृतपणे ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहेत, असा आरोप महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावर केला आहे. या प्रकरणात सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याच प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुणे येथे येणार होते; पण १३ मार्च या दिवशी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी जबाब घेतला. त्यामुळे ते पुणे येथे जाऊ शकले नाहीत. त्या धर्तीवर पुणे येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन आंदोलनाला प्रारंभ केला.