सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांचा संशय
पुणे – २ मासांपूर्वी जळगाव येथील एका व्यक्तीने मला भिंतीवरील घड्याळ भेट दिले होते. त्यात छुपा कॅमेरा असावा आणि त्याद्वारे ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करण्यात आले असावे, असा संशय विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याचा आरोप असणारा तेजस मोरे हा तरुण जळगाव येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध जळगावच्या शहर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये खंडणीचा गुन्हा नोंद असून न्यायालयाने फेब्रुवारी मासात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने आपल्याला आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी कटकारस्थान रचले असल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात विधानसभेत ‘पेनड्राईव्ह’ सादर केला होता. यात १२५ घंट्यांचे व्हिडिओ संभाषण असून हे सर्व कारस्थान चव्हाण यांच्या पुणे येथील कार्यालयात झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.