खासदार शरद पवार यांचे नाव आतंकवादी दाऊद इब्राहिमशी जोडल्याचे प्रकरण
मुंबई – माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा संबंध आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिमशी जोडला होता. या प्रकरणी नितेश आणि नीलेश राणे बंधूंच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की,…
१. नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलतांना ‘नवाब मलिक यांचे त्यागपत्र का घेत नाही ?’, अशी विचारणा शरद पवार यांना केली होती. ‘अनिल देशमुख मराठा असल्याने त्यांचे त्यागपत्र घेतले; मात्र नवाब मलिक मुसलमान असल्याने त्यांचे त्यागपत्र घेतले नाही’, असेही नितेश राणे यांनी त्या वेळी म्हटले होते.
२. नितेश राणे हे हिंदु-मुसलमान गटात तेढ आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नीलेश राणे यांनी ‘शरद पवार हे दाऊदचा माणूस आणि पाकिस्तानचा एजंट आहेत’, असे ट्वीट केले होते.
३. यावरून नितेश राणे आणि नीलेश राणे हे जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करून तेढ निर्माण करत आहेत. दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांची मानहानी करत आहेत. तसेच दाऊदशी संबंध जोडल्याने शरद पवार यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.