४ अटी मान्य केल्या, तर युद्ध लगेच थांबवू !

रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या ४ अटी !

कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यात ७ मार्च या दिवशी बेलारूस येथे तिसर्‍या टप्प्याची चर्चा झाली. यामध्ये ‘युक्रेनने जर आमच्या ४ अटी मान्य केल्या, तर आम्ही युद्ध थांबवू’ असे रशियाने सांगितले.

रशियाने ठेवलेल्या ४ अटी

१. युक्रेनने सैन्य कारवाई थांबवल्यास रशियन सैन्य गोळीबार करणार नाही.

२. युक्रेनने त्याच्या राज्यघटनेमध्ये सुधारणा करावी. ‘युक्रेन तटस्थ राहील आणि जागतिक स्तरावर कोणत्याही गटात सहभागी होणार नाही’, अशी सुधारणा करावी.

३. युक्रेनने ‘क्रिमिया’ला ‘रशियन प्रदेश’ म्हणून मान्यता द्यावी.

४. डोनेस्तक आणि लुगान्स्क स्वतंत्र राष्ट्रे आहेत, हे युक्रेनने मान्य करावे अन् त्यांना ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता द्यावी. असे केल्यास हे युद्ध लगेच थांबेल.

युक्रेनमधील रशियन ऑर्थोडॉक्स चर्चकडून रशियाच्या सैन्याला साहाय्य !

लंडन/मॉस्को – युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे ‘मदर रशिया’ धोरण (रशिया मातृभूमी असून तिच्या रक्षणासाठी पुढे येणे) लाभदायक ठरत असल्याचे दिसत आहे. या धोरणाद्वारे युक्रेनच्या अनेक शहरात रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला (चर्चच्या शाखेचा एक प्रकार) स्वतःच्या बाजूने करण्यास पुतिन यशस्वी झाले आहेत. युक्रेनच्या लवीव, सुमी, कोलोमया, वोयलनस या शहरांत रशियन ऑर्थोडॉक्स चर्च श्रद्धाळूंसाठी बंद झाली आहेत. आता या शेकडो वर्षे जुन्या चर्चमध्ये रशियन सैनिकांसाठी शिधा आणि शस्त्रे जमवली जात आहेत.

युक्रेनी संरक्षण संस्थांनी नुकतीच युक्रेनच्या अनेक चर्चमध्ये पडताळणी केली. यात दिसले की, चर्चशी संबंधित लोक रशियाच्या सैनिकांना शहरांविषयी अनेक गोपनीय माहिती देत आहेत. पश्चिम युक्रेनच्या पोचियेव शहरातील सर्वांत जुन्या चर्चमध्ये चौकशीत आढळले की, हे चर्च भाविकांसाठी बंद आहेत; परंतु येथे सुमारे ५०० लोकांसाठी शिधा जमवला गेला आहे.

रशिया ईश्वराला काय उत्तर देणार ? – झेलेंस्की

युक्रेनी राष्ट्रपती झेलेंस्की यांनी म्हटले, ‘युद्धाच्या निर्णायक दिवशी रशिया ईश्वराला काय उत्तर देणार ? ईश्वर रशियाला कधीच क्षमा करणार नाही.’