कीव (युक्रेन) – रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पोलंडला पळून गेल्याच्या अफवेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ प्रसारित केला. यामध्ये ते त्यांच्या कार्यालयात दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आणखी एक कर्मचारी दिसत आहे. ‘मी कीवमध्ये आहे. मी इथूनच काम करत आहे. कुठेही लपलेलो नाही’, असे त्यांनी लिहिले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात झेलेंस्की युक्रेन सोडून पळून गेल्याची अफवा पसरवल्याची ही दुसरी वेळ आहे. या वेळी रशियाच्या एका राजकारण्याने झेलेंस्की पोलंडला पळून गेल्याचा दावा केला होता. झेलेंस्की यांनी २ मार्च या दिवशी युक्रेन सोडल्याची अफवा होती. यापूर्वी अमेरिकेने झेलेंस्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. तेव्हाही झेलेंस्की यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून ते युक्रेनमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते.