मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर येथील पंचगंगा नदी प्रदूषणास उत्तरदायी असणार्या घटकांवर कारवाई करावी, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिले आहेत. पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. या संदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, प्रमोद माने आदी उपस्थित होते.
(सौजन्य : ABP MAJHA)
या बैठकीत कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ३९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते यासाठी १२ ठिकाणी काही उपाययोजना केल्या असून प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.’’
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘‘कोल्हापूर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभी केली आहेत; मात्र त्याची क्षमता वाढण्याची आवश्यकता असून त्यासाठी निधी हवा आहे.’’