अमरावती – मी येथे नसतांनाही जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले आहे, असा थेट आरोप येथील आमदार रवि राणा यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला. माझ्या विरोधात षड्यंत्र रचणार्यांचे सर्व हिशोब चुकते होणार आहेत, असेही ते या वेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गृहमंत्री आणि पोलीस यांना हाताशी धरून माझ्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ लावून खोटे गुन्हे नोंद केले आहेत. त्या वेळी मी देहली येथे होतो. ही माझी फसवणूक आहे. जर महाविकास आघाडी सरकार खोटा गुन्हा नोंद करून आमदाराला फसवत असेल, तर तेथे सामान्य जनतेची काय अवस्था होत असेल ? मी देहली येथील न्यायालयातून जामीन घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा नोंद करणार्यांवर मानहानीचा दावा प्रविष्ट करणार आहे.
अनेक मंत्री ‘ईडी’च्या रडारवर !
अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा १ सहस्र २०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल, असा दावा रवि राणा यांनी केला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण ईडी करत आहे, तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणारे अनिल परब यांचे घोटाळेही समोर येतील, असे रवि राणा म्हणाले.