भूमी खरेदी करण्यासाठी मलिक यांच्याकडे पैसे कुठून आले ? याची चौकशी करण्याची मागणी
धाराशिव, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या नावाने धाराशिव तालुक्यातील जवळा येथे १५० एकर भूमी असून इतक्या मोठ्या प्रमाणात भूमी खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसे कुठून आले ? याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाने करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.
मलिक यांनी धाराशिवसारख्या ग्रामीण भागात १५० एकर भूमी खरेदी करतांना भूमीचे मूल्यांकन न्यून दाखवून खरेदी केले आणि सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे. शेतकरी नसतांना मलिक कुटुंबाने भूमी खरेदी केली असून अनेक गोष्टी संशयास्पद असल्याने अंमलबजावणी संचालनालयाने याचीही चौकशी करावी, अशी मागणी काळे यांनी केली. मलिक यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावे असलेली ही भूमी ८ वर्षांपासून पडीक आहे.