युद्धातूनी शिकावे !

पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन परत मिळवण्यासाठी भारताने आक्रमक व्हावे !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगाला उद्देशून भाषण करताच ५ मिनिटांत रशियाने युक्रेनवर आक्रमण चालू केले. रशियाचे युद्धकौशल्य पहाता युक्रेन फार दिवस त्याच्या समोर तग धरेल, असे वाटत नाही. रशियाने स्वतःला हवे ते मिळवण्यासाठी कधीही ‘अमेरिकेला काय वाटेल ?’, ‘युरोपीय देशांना काय वाटेल ?’, याची चिंता केली नाही. रशियाने एक लक्ष्य ठेवले आणि ते साध्य करण्यासाठी पावले उचलत राहिला. पुतिन फार आधीपासून ‘युक्रेन हा सांस्कृतिक, भाषिक आणि राजकीय दृष्ट्या रशियाचा भाग आहे’, असे वारंवार सांगत होते. त्यामुळे युक्रेनवर ‘रशिया’ नावाची टांगती तलवार कायमच होती. युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होण्यासाठी पावले उचलल्यावर दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच चिघळले आणि त्याचे पर्यवसान युद्धात झाले. युक्रेनमध्ये रशियन भाषा बोलणार्‍यांना रशियासमवेत जायचे आहे, तर युक्रेनियन भाषा बोलणार्‍यांना युरोपियन देशांशी व्यापारी आणि सामरिक संबंध वाढवायचे आहेत. रशियाने युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या २ प्रांतांना ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिली. ‘रशिया इथेच थांबेल’, असे वाटत असतांना रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. पुतिन यांना युक्रेनचे निःशस्त्रीकरण करायचे आहे. पुतिन यांच्या युद्धखोर वृत्तीचे समर्थन करणे चुकीचे ठरेल; मात्र त्यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेऊन ‘आम्ही जगाचे तारणहार आहोत’, अशा आविर्भावात रहाणार्‍या अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा उघड केले आहे.

पुतिन यांची युद्धनीती !

वर्ष १९९१ मध्ये ‘सोव्हिएत रशिया’चे विघटन झाले. रशियाच्या विघटनानंतर अमेरिका जगातील एकमेव महासत्ता झाली; मात्र अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध तिथेच संपलेले नाही. रशियाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे स्वप्न पहाणारे व्लादिमिर पुतिन यांच्याकडे एकहाती सत्ता आल्यानंतर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कामाला लागले. ‘अमेरिका सांगेल ती पूर्व दिशा’, अशी जगात स्थिती असतांना पुतिन यांनी अमेरिकेला डोळे वटारून दाखवण्याचे धारिष्ट्य दाखवले. युक्रेनवर रशियाचे आधिपत्य कसे राहील ? यासाठी पुतिन यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी जगातील कुठल्याही महासत्तांना जुमानले नाही.

‘पुतिन यांच्या मनात काय चालले आहे ?’, हे समजणे कठीण आहे. त्यामुळे ‘रशिया-युक्रेन युद्ध कधी थांबणार ?’, हे समजणे कठीण आहे. रशियाने आतापर्यंत ज्या चाली खेळल्या, त्या त्याच्या विरोधकांना कळल्या नाहीत किंवा ‘रशिया असे काही करील’, असे कुणाला वाटले नव्हते. रशियाने युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारल्यावर ‘जो बायडेन विरुद्ध पुतिन’ असा सामना रंगणार, असा जागतिक राजकीय तज्ञांचा कयास होता; मात्र सध्या तरी पुतिन हे बायडेन यांच्यावर भारी पडल्याचे चित्र आहे. रशियाला प्रत्युत्तर देतांना अमेरिकेने ‘रशियावर आर्थिक निर्बंध लावणार’ वगैरे भाषणबाजी देण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे अमेरिका रशियाला धडा शिकवणार ? कि केवळ बघ्याची भूमिका घेणार ? हे येणारा काळच सांगेल.

कणखर नेतृत्वाची आवश्यकता !

जागतिक हितासाठी नाटो, संयुक्त राष्ट्रे, जी-२० इत्यादी अनेक संस्था सध्या कार्यरत आहेत. या संस्थांनी युक्रेनसाठी काय केले ? ‘युद्ध झाले, तर युक्रेनला साहाय्य करू’, अशी आश्वासने सर्वांनीच युक्रेनला दिली; मात्र कुणीही त्याच्या साहाय्याला पुढे आले नाही. यावरून अशा संस्थांचा जागतिक स्तरावर काहीही उपयोग नाही, हे लक्षात येते. यावरून जेव्हा एखाद्या राष्ट्रावर संकट येते, त्या वेळी त्याच्या रक्षणाची तरतूद त्या देशाने स्वतःच करावी लागते. अन्य देशांवर अवलंबून राहिले, तर युक्रेनसारखी गत होणार, हे या युद्धामुळे समोर आले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेेलेंस्की

कणखर नेतृत्व आणि स्वयंसिद्ध राष्ट्र असेल, तर काय होऊ शकते ? हे रशियाच्या भूमिकेतून दिसून येते. रशिया नैसर्गिक वायू, कच्चे तेल यांचा पुरवठा करतो. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर जर्मनीने ‘नॉर्ड स्ट्रीम २’ वायूवाहिनी प्रकल्प रहित करून रशियाला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र रशिया त्याला बधला नाही; कारण युरोपीय देशांना रशियाने नैसर्गिक वायूचा पुरवठा करणे बंद केले, तर युरोपीय देशांचे धाबे दणाणतील. यातून ‘जो देश इंधन, तसेच अन्य गोष्टींत स्वयंपूर्ण, तोच जगावर अधिराज्य दाखवू शकतो’, हेच सिद्ध होते.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याचा लाभ उठवत चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानवरून फेरफटका मारला. चीन तैवानला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे, हे जगजाहीर आहेच. दुसरीकडे रशिया युक्रेनवर आक्रमण करत असतांनाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही रशियात असून रशियाच्या आक्रमणाविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘अगदी मोक्याच्या वेळी मी इथे आलो असून मी प्रचंड उत्सुक आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्या राष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर आहे आणि ज्यांने वारंवार भारताकडून युद्धात पराजय पत्करला आहे, तो पाकिस्तान रशियाच्या आक्रमणावर फुशारक्या मारत आहे, हे आश्चर्यकारक आहे.

‘बळी तो कान पिळी’, हाच जगाचा नियम आहे. त्यामुळे ‘अमेरिका काय म्हणेल ?’, ‘नाटो’ काय म्हणेल ?’, याचा भारताने विचार न करता स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास पूर्वीचे राजे चक्रवर्ती होते आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. इंग्रजांच्या काळात पाकिस्तान, भूतान, नेपाळ यांसह भारताचे लचके तोडले गेले. एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान यांना धूळ चारायची असेल, तर भारताने स्वयंसिद्ध होणे अपरिहार्य आहे. अशाने भारताला गतवैभव मिळवणे शक्य होईल !