नवी देहली – ‘रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट’ने नुकताच ‘वॉर क्लाऊड ओवर द इंडियन होरिझोन’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात म्हटले आहे की, वर्ष २०२५ ते २०३० या कालावधीत भारत आणि चीन यांमध्ये युद्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. वर्ष २०२० मध्ये गलवान येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षापासून चीन आक्रमकपणे तिबेट सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तिबेटी नागरिकांचा भारताविरुद्ध वापर करून तिबेटींना भारताविरुद्ध कोणत्याही संभाव्य युद्धात लढायला लावणे ही चीनची रणनीती आहे. यासाठी चीन तिबेटी मुलांना चीनची भाषा मंडेरियन शिकवत आहे. तसेच त्यांना सैनिकी प्रशिक्षणही देत आहे. अलीकडेच एका तरुण तिबेटी मुलीला चीनच्या वायूदलामध्ये भरती करून तिला लढाऊ विमाने उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
१. तिबेटला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याच्या नावाखाली तिबेटला भारताविरुद्ध सिद्ध करायचे आणि युद्ध झाल्यास तिबेटींना सैन्यात पाठवायचे, अशी चीनची रणनीती आहे, असे चीनविषयक तज्ञांचे म्हणणे आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून चीनने प्रत्येक तिबेटी कुटुंबातील एका सदस्याला सैन्यात पाठवणे बंधनकारक केले आहे. भारतासमवेतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे हे पाऊल पुढे आले आहे. याआधीही, चीनने भारतीय सीमेजवळ तैनात करण्यासाठी सैन्यामध्ये तिबेटी लोकांची भरती मोहीम चालू केली आहे.
२. भारतीय संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे की, वर्ष २०२० च्या गलवान संघर्षात मारले गेलेल्या ३८ चिनी सैनिकांची नावे उघड झाली आहेत. त्यांपैकी ८ तिबेटी होते आणि त्यांची नावे पिनयिनमधील तिबेटी नावांशी जुळत होती. सध्या चिनी सैन्यात ७ सहस्र तिबेटी आहेत. चीनला वाटते की, तिबेटी लोक लडाखसारख्या उंच हिमालयीन भागांत चांगले काम करू शकतात; कारण त्यांना तेथील हवामानाची सवय आहे. दुसरीकडे एका सामान्य चिनी सैनिकाला श्वास घेण्यास त्रास होणे आणि उंचावरील आजार यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
३. चीन प्रकरणातील तज्ञ साहाय्यक प्राध्यापक राकेश कुमार म्हणले की, चीन तेथील तरुणांवर पुष्कळ लक्ष केंद्रित करतो; कारण त्याला तरुणांचे महत्त्व ठाऊक आहे. तो तिबेटी तरुणांना चिनी भाषा शिकवत आहे आणि चिनी कम्युनिस्ट पक्षावर विश्वास ठेवायला शिकवत आहे. चीनच्या या प्रचारामुळे तिबेटमधील लोकांचा चीनवरील विश्वास वाढेल, असे चीनला वाटते.
४. चीनचे सैन्य तिबेट स्वायत्त प्रदेशातील तिबेटी आणि नेपाळी लोकांची सैन्यात भरती करत आह. या लोकांना हिंदी आणि नेपाळी भाषा येत असल्याने त्यांना प्राधान्याने भरती करण्यात येत आहे. ते भारतीय सीमेवर गुप्त माहिती गोळा करू शकतात. अशा तरुणांना हेरण्यासाठी सैन्याधिकारी चीनमधील अनेक महाविद्यालये आणि विद्यापिठे यांना वेळोवेळी भेटीही देतात.
संपादकीय भूमिकाभारतद्वेषाने पछाडलेला चीन भारतावर मात करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण. अशा चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! |