सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील वाई शहरातील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम चालू आहे. याच विहिरीत १७ व्या शतकातील ७ कट्यारी आणि १ खंजीर आढळून आले आहेत. ही पुरातन हत्यारे वाई पोलिसांनी कह्यात घेतली असून लवकरच ती पुरातत्व विभागाकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत.
वाई शहरातील महागणपति मंदिर परिसरामधील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातील विहिरीतील गाळ अनेक दिवसांपासन काढण्यात आलेला नाही. त्यामुळे विहिरीतील पाण्याला उपसा नव्हता, तसेच परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे मंदिर विश्वस्त शैलेंद्र गोखले यांनी विहिरीतील गाळ काढण्यास प्रारंभ केला असता त्यांना कट्यारी आणि खंजीर सापडले. गोखले यांनी याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे-खराडे यांना दिली. त्यांनी तातडीने पुरातन हत्यारांचा पंचनामा केला. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी ही शस्त्रे १७ व्या शतकातील असावीत, असे मत व्यक्त केले आहे. लवकरच ही शस्त्रे संग्रहालयाच्या कह्यात देण्यात येणार आहेत.