रशिया-युक्रेन सीमासंघर्ष
|
पॅरिस (फ्रान्स) – रशिया युक्रेनच्या कोणत्या नागरिकांची हत्या करणार अथवा कुणाला कह्यात घेणार, याची सूची सिद्ध केली आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाने मात्र हा दावा पूर्णत: खोटा असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन सीमासंघर्षाच्या प्रकरणाच्या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भेटण्याची सिद्धता दर्शवली आहे. ‘फ्रान्सने पुढाकार घेतल्यामुळे ही बैठक होऊ शकते; परंतु ही बैठक होण्यासाठी ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण करता कामा नये’, अशी अट ‘व्हाईट हाऊस’च्या वतीने घालण्यात आली आहे. ‘ही भेट झाल्यास युरोपात गेल्या अनेक दशकांतील सर्वांत मोठ्या युद्धसंकटाचे भय निवळण्याची शक्यता आहे’, असे संरक्षणतज्ञांचे मत आहे. रशियाने मात्र ‘पुतिन-बायडेन यांच्यात चर्चा होण्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात कोणत्याच ठोस योजना आखण्यात आलेल्या नाहीत’, असे म्हटले आहे.
१. अमेरिकी अधिकार्यांच्या मते रशिया हा युक्रेनवर केव्हाही पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करू शकतो. तिथे रशिया या दाव्याला चुकीचे ठरवत आहे.
२. व्हाईट हाऊसच्या मते रशियाकडून आतापर्यंत १ लाख ५० सहस्र सैनिक हे युक्रेनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.
३. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीला सांगितले, ‘रशियावर घालण्यात येणार असलेले आर्थिक निर्बंध यांवर पाश्चात्त्य देशांमध्ये चर्चा होत असून याचे रशियावर घातक परिणाम होतील. असे असले, तरी युद्ध चालू करण्यापासून ते पुतिन यांना रोखू शकणार नाहीत, असेही म्हटले जात आहे.