कर्नाटक: उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शाळांमध्ये हिजाब घालण्यास मनाई असतांना अनेक मुसलमान विद्यार्थिनींचा परीक्षांवर बहिष्कार

‘शिक्षणापेक्षा हिजाब मोठे समजणारे इस्लामी देशांत का रहायला जात नाहीत ?’, असा प्रश्‍न कुणी विचारला, तर त्यात आश्‍चर्य ते काय ? – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील हिजाबच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने याविषयीच्या याचिकांवर जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणताही धार्मिक पोशाख घालून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये जाण्यावर बंदी असेल, असा आदेश दिला आहे. या आदेशाचे मात्र उल्लंघन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये परीक्षेच्या वेळी मुसलमान मुली हिजाब घालून आल्याने त्यांना हिजाब काढण्यास सांगूनही त्यांनी नकार दिला आणि परीक्षा न देताच निघून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.

१. शिवमोग्गा शहरातील ‘कर्नाटक पब्लिक स्कूल’मधील अनेक मुसलमान विद्यार्थिनींनी १० वीच्या प्राथमिक परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. विद्यार्थिनी हिना कौसर हिने सांगितले की, मला शाळेत प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगितले होते. मी ते करू शकत नाही; म्हणून मी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही अनेक विद्यार्थिनींनी असेच कले.

२. उडुपीच्या पाकीरनगर येथील सरकारी उर्दू शाळेतील विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, शाळेत हिजाब घालण्यास बंदी असल्याने मी तिला शाळेत पाठवत नाही. आतापर्यंत आमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी हिजाब घालून या शाळेत शिक्षण घेतले आहे; मग अचानक नियम का पालटले ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.