हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
१४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. त्या निमित्ताने…
१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्या व्हॅलेंटाईनला ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कुणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले, त्याच्या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे, हे दुर्दैवी आहे. ‘‘प्रेम दिवस’ म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैंगिक अत्याचारांपासून स्वतःच्या पाल्यांना वाचवा अन् युवतींवरील अत्याचाराला पूरक ठरणारी ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती बंद करा’, असे आवाहन करण्याची आज आवश्यकता आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करण्याची कारणे
१. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या नादात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी गुन्हे घडतात; तसेच मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदीही वाईट कृत्ये केली जातात. हे अत्यंत गंभीर आहे.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ७ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत गर्भनिरोधकाच्या (कंडोमच्या) विक्रीमध्ये २० ते २५ टक्के वाढ होते, तसेच गर्भनिरोधक औषधे आणि गर्भधारणा तपासणी संच (प्रेंग्नन्सी टेस्ट कीट) यांच्या विक्रीतही वाढ होते. या व्यतिरिक्त लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, कुमारीमाता बनणे आदी गंभीर समस्याही निर्माण होत आहेत. देशात महिलांवरील अत्याचारांत होणारी प्रचंड वाढ पहाता या दुष्परिणामांकडे अत्यंत गांभीर्याने पहायला हवे !
३. हिंदु संस्कृती ही सर्व प्राणीमात्रांवर सदासर्वकाळ प्रेम करण्यास शिकवते, तर ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे एका दिवसापुरते प्रेम करायला शिकवतात. यातून युवा पिढी व्यापक न होता संकुचितच होत आहे.
४. ‘व्हॅलेंटाईन डे’चे स्तोम वाढण्यामागे विदेशी आस्थापने आहेत. युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी गुलाबाची फुले, हृदयाच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू आदींद्वारे गल्ला भरला जातो, हे समजून घ्यायला हवे.
५. रशिया आणि अमेरिका खंडातील काही देश, तसेच चीन, इटली, स्वीडन, दक्षिण कोरिया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; तर पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, मलेशिया या इस्लामी देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा केला, तर कठोर शिक्षांची तरतूद आहे. मग ‘आपण हा दिवस का साजरा करत आहोत ?’, याचा विचार करायला हवा !
६. प्रेम आणि वासना यांतील अंतर हिंदु संस्कृती सांगते, तर वासनेलाच प्रेम समजणारी पाश्चात्त्यांची परंपरा आहे. ही शिकवण आज या दिवसाच्या माध्यमातून भारतीय युवा पिढीत वाढत चालली आहे. जी अत्यंत घातक आहे. (वर्ष २०२०)
(साभार : ‘हिंदु जनजागृती समिती’चे संकेतस्थळ)