सरकारच लोकांना व्यसन लावण्याचे काम करत आहे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय न पालटल्यास आमरण उपोषण !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

नगर – व्यसनमुक्तीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत; मात्र येथे सरकारच लोकांना व्यसन लावण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा असून मी त्याचा विरोध करतो, असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णयाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आहे, तसेच या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारने घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला १४ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी देत आमरण उपोषणाची चेतावणी दिली आहे.

अण्णा हजारे यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्र्यांना पहिले पत्र पाठवले होते; मात्र त्या पत्राचे कोणतेही उत्तर राज्य सरकारने दिले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी अण्णांनी स्मरणपत्र लिहिले आहे. या प्रकरणी अजित पवार यांनाही मी पत्र पाठवले असून त्याचेही कोणतेच उत्तर न आल्याचे सांगितले.