AI At Kumbh : प्रयागराज महाकुंभ पर्वात ‘एआय’द्वारे सुरक्षाव्यवस्था असणार : चोरीची शक्यता अत्यल्प !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे होणार्‍या महाकुंभ पर्वात ‘एआय’द्वारे (कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे) संरक्षणव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदु भाविकांची कोणतीही वस्तू चोरीला जाऊ शकणार नाही. या अंतर्गत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असतील. त्यामुळे कुणी चोरीचा प्रयत्न केलाच, तर त्याला लगेच पकडले जाईल.

महाकुंभ पर्व २०२५ च्या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाकुंभ पर्वाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, यंदाचे महाकुंभ पर्व जागतिक ‘ब्रँडिंग’चा महाकुंभ बनेल; कारण या कुंभ पर्वाविषयी जगभरातील लोकांमध्ये उत्साह आहे. आता धर्म आणि अध्यात्म यांकडे लोकांचा कल वाढला आहे. अशा स्थितीत या महाकुंभ पर्वाला कोट्यवधी लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दायित्व सोपवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

प्रयागराज महाकुंभ पर्वात हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची उत्तरप्रदेश शासनाने व्यापक व्यवस्थाही करावी, ही अपेक्षा !