संभाजीनगर – नोव्हेंबर २०२१ ते २४ जानेवारी २०२२ या कालावधीत अधूनमधून महाराष्ट्रात वादळी वारे वाहिले, पाऊस पडला आणि गारपीटही झाली. असे हवामान पालटल्यामुळे २ लाख ५८ सहस्र ६६ हेक्टरवरील फळपिकांची अतोनात हानी झाली आहे, अशी नोंद राज्य कृषी विभागाने केली आहे. हिवाळ्यात स्वच्छ प्रकाश पडून गुलाबी थंडी जाणवत असते; पण हवामान पालटल्यामुळे ऋतुचक्रच पालटले आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही १२ मास पाऊस पडण्याचा विक्रम झाला आहे. विशेषत: नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये थंडीच्या प्रमुख मासांत १५ जिल्ह्यांत जेथे पोषक वातावरण आहे, तेथेच अल्पअधिक फरकाने वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीटही झाली आहे. यात प्रामुख्याने कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, विदर्भ, संभाजीनगर आणि लातूर विभागांतील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
नैसर्गिक आपत्तीत पहिल्या पंधरवड्यात १६ जिल्ह्यांत आणि २८ अन् २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत अवकाळी पावसाने पुन्हा १५ जिल्ह्यांतील एकूण २ लाख ३ सहस्र १०६ हेक्टरवरील पिकांची अतोनात हानी केली. जानेवारीच्या २३ दिवसांत ३२.८ टक्के पाऊस पडला. यात पुन्हा ११ जिल्ह्यांतील ५४ सहस्र ९६० हेक्टर, असे एकूण २ लाख ५८ सहस्र ६६ हेक्टरवरील गहू, ज्वारी, मका, भात, नागली, भादली, ओवा, तूर, हरभरा, कडधान्य, केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी, कलिंगड, भाजीपाला, कांदा, ऊस आणि फूल या पिकांची हानी झाली आहे.