|
विरार, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – काही जण विनाअनुमती गोमांस विकत असल्याचे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस आणि महापालिका यांच्या प्रशासनाला निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर वसई आणि विरार या शहरांतील अवैध गोमांस विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश वसई, विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी दिले आहेत.
वसई-विरार शहर महानगरपालिकेने मांस विकण्याचे परवाने दिले होते; मात्र यातील काही मांस विक्रेते गायी आणि गोवंशीय यांचे मांस विकण्यास कायद्याने बंदी असतांनाही हे मांस विकत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने परवाना दिलेल्या मांस विक्रेत्यांचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सर्वेक्षण केले. महापालिकेने परवाना दिलेल्या विक्रेत्यांपैकी ८ जणांवर गायी आणि गोवंशीय यांचे मांस विकणे, त्यांची हत्या करणे असे गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे काही जणांवर १५ ते २० गुन्हे नोंद आहेत. अशा कसायांनाही मांस विक्रीचे परवाने देण्यात आले आहेत.
पोलिसांकडूनही महापालिकेला पत्र
‘बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या हत्येमुळे हिंदु संघटना आक्रमक झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे परवाने रहित करण्यात यावेत’, असे पत्र महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पोलिसांनी पाठवले होते.
त्यानंतर महापालिकेनेही सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात प्रत्यक्षात ६ परवानाधारक आणि १४ विनापरवानाधारक मांस विक्रेत्यांनी गोमांसाची विक्री केल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत, त्यांचे परवाने रहित करावे आणि १४ विनापरवानाधारक मांस विक्रेत्यांची दुकाने त्वरित बंद करून त्यांच्यावर कारवाई करावी, असा आदेश अजिंक्य बगाडे यांनी दिला आहे.