किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

राज्यपालांकडे मंत्रीमंडळ विसर्जित करण्याची मागणी करणार

किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा ! – संपादक 

पत्रकार परिषदेत डावीकडून अविनाशबापू सावंत, श्री. अंकुश जाधव, पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. संजय तांदळे

सांगली, २८ जानेवारी (वार्ता.) – सरकारने किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, राष्ट्रघातक, धर्मविरोधी, समाजाला हानीकारक आणि भारतमातेची पवित्रता नष्ट करणारा आहे. पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याचा हा निर्णय अत्यंत अयोग्य असून या निर्णयाला विविध सामाजिक संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, साधू-संत यांनीही विरोध केला पाहिजे. मंत्रीमंडळाने असा चुकीचा निर्णय घेतल्याविषयी राज्यपालांकडे मंत्रीमंडळ विसर्जित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सांगलीत २८ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी धारकरी सर्वश्री अविनाशबापू सावंत, अंकुश जाधव आणि संजय तांदळे उपस्थित होते.

पू. भिडेगुरुजी या वेळी म्हणाले,

१. राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी त्या राष्ट्राला उदात्त, पवित्र, आचार-विचार यांचे अधिष्ठान असावे लागते. समाज हा दिशाहीन असतो, त्याला दिशा देण्याचे काम हे शासनकर्त्यांचे असते. योग्य काय ? अयोग्य काय ? हे लोकप्रतिनिधींनी समाजाला सांगायचे असते.

२. लोकशाहीत संघटन करण्याचे स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य देण्यात आले आहे; म्हणून असा निर्णय घेणे अत्यंत अयोग्य आहे. विकास, सुधारणा आणि प्रगती यांसाठी हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जाते. यातून महसूल वाढतो, असे शासन सांगत आहे; मात्र हे सर्वस्वी अयोग्य असून या निर्णयाने देश हा पशूत्वाकडे जाणारा आहे.

३. या निर्णयाला मंत्रीमंडळात कुणीही विरोध केला नाही, हे आश्चर्यकारक आहे. अन्य राज्यांत मद्यबंदी नाही, असे सांगून महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही.

४. मुंबईला ‘आम्ही नाईट लाईफ देऊ’, अशा प्रकारची भाषा ही व्यभिचाराची भाषा असून ते सर्वनाशाच्या दिशेने पडलेले पाऊल आहे.


सरकारने निर्णय तात्काळ मागे घेऊन मंत्रीमंडळाने सामूहिक क्षमायाचना करावी !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन

सांगली – सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नगरप्रमुख श्री. अविनाशबापू सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी उपस्थित होते. ‘हा निर्णय तात्काळ मागे घेऊन श्री शिवछत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाशी मंत्रीमंडळाने सामूहिक क्षमायाचना करावी. हे जर तात्काळ झाले नाही, तर समाजात उठणारे संतापाचे उद्रेक अनावर असतील’, असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.