६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. लतिका पैलवान (वय ६४ वर्षे) यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !

मूळच्या सोलापूर येथील सौ. लतिका पैलवान सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास आहेत. या लेखात त्यांनी कृतज्ञताभावाने लिहिलेला साधनाप्रवास पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. भूतकाळातील प्रसंगांत अडकल्यामुळे होणारे त्रास आणि त्यातून आलेले आत्महत्येचे टोकाचे विचार !

१ अ. ‘मी कधीच कोणाशी वाईट वागले नसतांना सासरच्या लोकांनी विनाकारण त्रास का दिला ?’, असे विचार तीव्रतेने येऊन सततचे आजारपण चालू होणे : ‘कलियुगातील सर्वसामान्य जिवांप्रमाणेच माझेही जीवन चालू होते. तीन मुले, पती आणि घरी येणारे पाहुणे या सर्वांचे करायचे. दिवसामागून दिवस जात होते. वरवर पाहता ‘सर्व चांगलेच चालले आहे’, असे वाटत होते; परंतु रात्र झाली की, मागील आठवणींनी जीव त्रस्त व्हायचा. ‘मी कधीच कोणाशी वाईट वागले नाही, तरी मला सासरच्या लोकांनी विनाकारण त्रास का दिला ?’, हा विचार एवढा तीव्र असायचा की, या विचारांमुळे पुढे मला सततचे आजारपणच चालू झाले. ‘माणसाला चिता एकदाच जाळते; परंतु चिंता क्षणाक्षणाला जाळते’, अशी माझी अवस्था झाली होती.

सौ. लतिका पैलवान

१ आ. आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे मन गुंतवण्यासाठी शाळेत नोकरी करू लागणे, त्यामुळे दिवस आनंदात जाणे; परंतु रात्र झाल्यावर पुन्हा तेच विचारचक्र चालू होऊन पुष्कळ त्रास होणे : शेवटी आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला कितीही औषधे दिली, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही तुमच्या मनातले विचार काढून टाका, नाहीतर एक दिवस तुम्हाला येरवड्याला (पुण्यातील एक भाग) वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल. तुम्ही तुमचे मन कशात तरी गुंतवा, जेणेकरून तुमच्या मनातील विचार थांबतील.’’ तसे पाहिले, तर घरी सर्व सुबत्ता होती; परंतु केवळ मनःशांतीसाठी मी शाळेत नोकरी चालू केली. थोड्याच दिवसांत मला ‘मुख्याध्यापिका’ म्हणून पदोन्नतीही मिळाली. नोकरीमुळे दिवस आनंदात जात होते; परंतु रात्र झाली की, पुन्हा तेच विचारचक्र चालू होऊन मला पुष्कळ त्रास व्हायचा.

१ इ. शक्तीपातयोगाची दीक्षा घेऊन साधना करू लागणे; पण मनाची अस्वस्थता न्यून न झाल्याने ‘सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा ‘स्वतःचे जीवन संपवून टाकावे’, असे आत्महत्येचे टोकाचे विचार येऊ लागणे : मनाला शांती मिळावी; म्हणून मी सतत गजानन महाराजांची पोथी वाचायचे. माझ्या वडिलांनी शक्तीपातयोगाची दीक्षा घेतली आहे. त्यांचे पाहून ‘आपणही ही दीक्षा घेऊया’, असे मी ठरवले. थोर संत गुळवणी महाराज यांचे शिष्य सद्गुरु केशवराव जोशी महाराज यांच्याकडून अनुग्रह घेऊन माझी शक्तीपात योगानुसार साधना चालू झाली. मला अनुभूतीही येऊ लागल्या; परंतु माझे मन मात्र सैरभैरच होते. सततचे आजारपणही चालूच होते. माझ्यामुळे आई-वडील, पती आणि मुले या सर्वांनाच त्रास व्हायचा. हा त्रास एवढा असह्य झाला की, पुढे पुढे सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा ‘आपणच आपले जीवन संपवावे’, असे आत्महत्येचे तीव्र विचार माझ्या मनात येऊ लागले.

२. सनातनच्या सत्संगाच्या माध्यमातून सनातन संस्थेशी झालेला संपर्क !

२ अ. शेजारी राहायला आलेली साधिका ‘तुमच्या घरी सनातनचा सत्संग चालू करूया’, असे म्हणू लागल्यावर तिच्या तळमळीमुळे घरी सत्संग चालू होणे : याच काळात सोलापूर येथे आमच्या शेजारी सौ. स्वामीवहिनी राहायला आल्या. पूर्वी त्या गोव्याला होत्या. त्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे जाहीर प्रवचन ऐकले होते. त्या माझ्या सारख्या मागे लागल्या, ‘‘वहिनी, तुमची बैठकीची खोली मोठी आहे. तुमच्या घरी सनातनचा सत्संग चालू करूया. तेथे अध्यात्माची खूप चांगली माहिती सांगतात.’’ आरंभी मी विचार केला, ‘मला गुरुप्राप्ती झाली आहे. मला गुरूंचे मार्गदर्शनही मिळत आहे, तर मी कशाला पुन्हा दुसरा मार्ग निवडायचा ?’; परंतु स्वामीवहिनी सारख्या मागे लागल्या, ‘‘एकदा सत्संग ऐकून तर बघा, नाही आवडले, तर सोडून द्या.’’ त्यांची तळमळ पाहून आमच्या घरी सत्संग चालू झाला.

२ आ. साधकांचा सत्संग, सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाचन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनपर ध्वनीफिती ऐकून मनातील आत्महत्येचे विचार निघून जाणे : सौ. केतकी येळेगावकर, श्री. अरुण डोंगरे आणि कु. शिल्पा डोंगरे (आताच्या सौ. शिल्पा दीपक जोशी) हे सर्वजण घरी सत्संगासाठी येत होते. सर्वांचे मार्गदर्शन, ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन, अध्यात्म’, या सनातनच्या ग्रंथांचे वाचन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनपर ध्वनीफिती ऐकून माझ्या मनातील आत्महत्येचे विचार निघून गेले. एका मार्गदर्शनामध्ये गुरुमाऊलीने म्हटले आहे, ‘वर्तमानकाळात रहा. एक महिला लग्न होऊन ४० वर्षे झाली, तरी ‘लग्न झाल्यावर मला तुमची आई तसे का म्हणाली ?’, असे म्हणून पतीशी अजूनही भांडते. लग्नाला ४० वर्षे झाली. सासू मरून स्वर्गात गेली, तरीही आपण त्यांच्यासाठी भांडतो आहोत. अरे, काय उपयोग आहे का याचा ? ४० वर्षांपूर्वीचे भूतकाळाचे भूत मानगुटीवर बसले आहे, ते काढून टाका. वर्तमानकाळात रहा, तरच तुम्ही आनंदी रहाल, नाहीतर उभे आयुष्य दुःखातच जाणार.’ ‘प.पू. गुरुदेवांनी हे उदाहरण माझ्या मनातील दुःख दूर करण्यासाठीच दिले’, असे मला वाटले. माझ्या विचारांना योग्य दिशा मिळायला लागली. ‘माझ्या मनात कोणतीही शंका आली, तरी त्याचे उत्तर प.पू. गुरुमाऊलींचा सत्संग, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’, तसेच सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ किंवा ध्वनीफिती यांच्या माध्यमांतून अजूनही मिळते’, याची अनुभूती अनेक वेळा येते.

२ इ. सत्संगामुळे ‘जीवनातील दुःख हे आपल्याच वाईट कर्मांचे फळ असून ते आनंदाने भोगून संपवायला हवे आणि पुढील प्रत्येक कृती ईश्वराकडे नेणारी असायला हवी’, हे मनावर पक्के ठसणे : देवा, माझ्या मनातील विचारचक्र थांबवण्यासाठीच हा सत्संग चालू झाला आणि मला आनंदी जीवनाचे गूढ समजले. ‘आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट विनाकारण घडत नाही. त्यामागे आपलेच चांगले-वाईट कर्म असते. आपण चांगल्या कर्मांची फळे आनंदाने उपभोगतो; परंतु वाईट कर्मांचे दुःखरूपी फळ मात्र आपल्याला नको असते. तेथे आपण देवाला दोष देतो. सत्संगामुळे ‘हे दुःख देवाने दिले नाही, तर आपल्याच वाईट कर्मांचे फळ आहे आणि ते आनंदाने भोगून संपवायला हवे, तसेच पुढील प्रत्येक कृती स्वतःला ईश्वराकडे नेणारी असली पाहिजे’, हे माझ्या मनावर पक्के ठसले. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ अशी केवळ पोपटपंची करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष तशी कृतीही व्हायला पाहिजे’, हे शास्त्र मला समजले. ‘मागच्या जन्मी मी माझ्या सासरच्या लोकांना असाच त्रास दिला असेल. त्याचे फळ या जन्मी मी भोगले आहे. आता त्या आठवणी मनात साठवणे, म्हणजे माझ्या पुढील जन्मासाठी मीच दुःख निर्माण करणे आहे’, हे प.पू. गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनातून माझ्या मनावर ठसले.

२ ई. शक्तीपातयोगाची साधना सोडून सनातनची साधना चालू केल्यामुळे मनात आलेला विकल्प आणि प.पू. गुरुमाऊलींनी दिलेली अनुभूती

२ ई १. ‘शक्तीपातयोगाची साधना सोडून आपण दुसरीकडे भरकटत आहोत’, या मनातील खटकणार्‍या विचारावर प.पू. गुरुमाऊलीने अचूक उत्तर देणे : सर्व व्यवस्थित चालू होते; परंतु मनात कुठेतरी एक गोष्ट खटकत होती, ‘आपण हे काय करत आहोत ? आपल्या गुरूंची शक्तीपात योगाची साधना सोडून आपण दुसरीकडेच भरकटत चाललो आहोत.’ यावरही प.पू. गुरुमाऊलीने उत्तर दिले, ‘गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, गुरु हे तत्त्व आहे. सर्व गुरु आपल्याला वरवर वेगळे वाटतात; परंतु ते आतून तत्त्वरूपाने एकच असतात. तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असा, गजानन महाराजांचे भक्त असा आणि आता सनातनच्या माध्यमातून साधना करत असलात, तरी तुमचे गुरु तुमच्यावर रागावणार नाहीत. तुम्ही योग्य मार्गाला लागलात; म्हणून त्यांनाही आनंदच होणार आहे.’ माझ्या संदर्भातही गुरुमाऊलीचे हे वाक्य खरे ठरले.

२ ई २. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाच्या माध्यमातून प.पू. गुरुमाऊलींनी ‘सर्व गुरु तत्त्वरूपाने एकच असतात’, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवल्यामुळे पुढील साधना निःशंक मनाने चालू होणे : एके दिवशी मी मनाचा पूर्ण निश्चय करूनच सत्संगाला गेले होते. आज आपण सत्संगामध्ये सत्संगसेवक श्री. अरुण डोंगरे यांना सांगायचेच की, आता पुढील सत्संगापासून मी येणार नाही. माझ्या गुरुदेवांनी सांगितलेली साधनाच मी करणार आहे.’ सत्संगात गेल्यानंतर मी काही बोलण्यापूर्वीच श्री. डोंगरेकाकांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील सद्गुरु श्री. केशवराव जोशी महाराज यांचा लेख वाचून दाखवला. त्यांनी म्हटले होते, ‘तुम्ही सर्व साधक दिवसभरातून किती वेळ शक्तीपात योगानुसार साधना करता ? फार तर १ – २ घंटे करता. त्यानंतरचा उरलेला वेळ तुम्ही सनातनच्या समष्टी सेवेसाठी द्या.’ अशा प्रकारे माझ्या मनातील शंकेचे निरसन लेखाद्वारे करून घेऊन प.पू. गुरुमाऊलींनी ‘सर्व गुरु तत्त्वरूपाने एकच असतात’, हे मला सप्रमाण सिद्ध करून दाखवले. त्यामुळे माझी पुढील साधना निःशंक मनाने चालू झाली.

– सौ. लतिका अशोक पैलवान, फोंडा, गोवा. (वर्ष २०१८)

(क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)

उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/547723.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक