६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या फोंडा (गोवा) येथील सौ. लतिका पैलवान (वय ६४ वर्षे) यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !
मूळच्या सोलापूर येथील सौ. लतिका पैलवान सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास आहेत. या लेखात त्यांनी कृतज्ञताभावाने लिहिलेला त्यांचा साधनाप्रवास पाहूया.
२७ जानेवारी २०२२ या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात ‘सौ. लतिका पैलवान यांचे साधनापूर्व जीवन आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला प्रारंभ’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील भाग पाहूया.
पूर्वार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/547364.html
३. घरा-दारावर ओढवलेली संकटे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे झालेले निवारण
३ अ. पातेल्यातील भात गुलालासारखा रंगून गेल्याने पुष्कळ भीती वाटून ‘हे काही तरी वेगळेच आहे’, हे लक्षात येणे : मला वाटते, ‘माझी साधना योग्य मार्गाने व्हावी, याची काळजी माझ्यापेक्षा गुरुमाऊलीलाच अधिक आहे.’ माझी साधना तर चालू झाली; परंतु अडथळे संपलेले नव्हते. एकदा जेवायला बसल्यानंतर ‘कूकर’मधून भाताचा डबा काढला. तेव्हा पातेल्यातील एका बाजूचा भात गुलालासारखा गुलाबी झाला होता. मला वाटले, तांदळाच्या पोत्यावर तशाच गुलाबी रंगाने नाव लिहिलेले आहे, त्यामुळे भात तसा झाला असेल; परंतु हळूहळू भाताचा रंग बदलणे वाढतच गेले. ते इतके वाढले की, पूर्ण पातेलेच गुलालासारखे रंगून गेले. तेव्हा मनात पुष्कळ भीती वाटली आणि ‘हे काही तरी वेगळेच आहे’, हे लक्षात आले.
३ अ १. पूर्ण कुटुंबाच्या जिवावर बेतलेले करणीचे संकट काहीही त्रास न होता आणि एकही पैसा व्यय करावा न लागता गुरुमाऊलीने दूर करणे : तेव्हा सौ. संगीता जाधव (आताच्या सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव) उत्तरदायी साधिका होत्या. त्यांना मी हे सर्व सांगितले. त्यांनी लगेच उपाययोजना सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘हा करणीचा प्रकार आहे. यासाठी भात शिजवण्यापूर्वी तांदूळ उदबत्तीच्या विभूतीच्या पाण्याने धुवून घ्या. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात चार दिशांना चार रिकामी खोकी, आकाशाच्या दिशेने एक रिकामे खोके आणि खाली जमिनीच्या दिशेला तोंड करून एक रिकामे खोके ठेवा.’’ (आकाशतत्त्वाच्या पोकळीप्रमाणे लाभ व्हावा, यासाठी सनातनचे साधक रिकाम्या खोक्यांचे उपाय करतात. – संपादक) हा उपाय चालू करताच ५ – ६ दिवसांतच भाताचा रंग बदलणे पूर्णपणे बंद झाले. हा एवढा मोठा करणीचा प्रकार बाहेर कोठेही न जाता केवळ प.पू. गुरुमाऊलीवर श्रद्धा ठेवून केलेल्या उपायांनी एक पैसाही न व्यय होता पूर्णपणे थांबला. अशा उपायांसाठी लोकांनी सहस्रो रुपये उकळले असते; परंतु माझ्या गुरुमाऊलीने माझ्या पूर्ण कुटुंबाच्या जिवावर बेतलेले करणीचे संकट दूर केले.
३ आ. थोड्याच दिवसांनी करणीचा प्रकार पुन्हा घडल्यावर ‘प.पू. गुरुमाऊली आपल्या पाठीशी आहे’, या श्रद्धेने भीती न वाटता शांत मनाने उपाय करता येणे : त्यानंतर थोड्याच दिवसांनी स्थुलातून काहीच कारण नसतांना घरात माझी खूप चिडचिड होऊ लागली. एक दिवस सत्संगाच्या खोलीच्या खिडकीच्या वरच्या बाजूला पाण्याचा सडा टाकतो, तसा रक्ताचा डाग पडलेला दिसला. त्याच वेळी वैद्या (कु.) माया पाटील आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी ते पाहिले आणि सांगितले, ‘‘हा करणीचा प्रकार आहे. त्या जागेवर गोमूत्र अन् विभूती शिंपडा. बाकी काही करण्याची आवश्यकता नाही.’’ हा उपाय केल्यावर ८ दिवसांत रंग हळूहळू न्यून झाला. एवढा मोठा प्रसंग घडला; परंतु ‘प.पू. गुरुमाऊली आपल्या पाठीशी आहे, तर कशाला घाबरायचे ?’, असा विचार झाला आणि शांत मनाने उपाय केले.
३ इ. मुलगा हुशार असूनही त्याचे शिक्षण १२ वी नंतर ६ वर्षे पूर्णपणे थांबणे; पण याचा ताण न येता प्रसंगाला शांतपणे सामोरे जाता येणे : माझा मुलगा कु. अमित पैलवान हा शाळेत आणि शिकवणीवर्गामध्ये ‘खूप हुशार मुलगा’ म्हणून ओळखला जायचा. ‘काय होत आहे ?’ हे कळलेच नाही आणि अशा हुशार मुलाचे शिक्षण १२ वी नंतर ६ वर्षे पूर्ण थांबले, तरीही मला ताण आला नाही. याही प्रसंगातून ‘प.पू. गुरुमाऊली तारून नेणार आहे’, असा विश्वास असल्याने शांतपणे या प्रसंगाला सामोरे जाता आले. त्या वेळचे उत्तरदायी साधक श्री. आठलेकर काकांनी अमितला २ वर्षे देवदला सेवेसाठी पाठवले आणि नंतर २ वर्षे तो बीडला प्रसारसेवेसाठी गेला. ६ वर्षांनी पुन्हा त्याने नव्याने संगणकीय डिप्लोमा अन् डिग्री घेतली.
४. कुटुंबियांची साधना
४ अ. ‘गुरुसेवेतील आनंदाची गोडी अवीट आहे’, हे पटल्यामुळे लहान मुलीने नोकरी सोडून पूर्णवेळ सेवा करण्याचा निश्चय करणे : माझी लहान मुलगी कु. अश्विनी हिने उच्च शिक्षण (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स) घेतले आहे. तिने पैसे मिळवण्यापेक्षा ‘गुरुचरणांची सेवाच करावी’, असे मला वाटत होते. आरंभी तिने नोकरी आणि सेवाही केली; परंतु पुढे गुरुमाऊलीच्या कृपेने तिला या भौतिक जगातील वैज्ञानिक सुखापेक्षा ‘गुरुसेवेतील आनंदाची गोडीच किती अवीट आहे’, हे पटले आणि तिने नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केला. नुकतीच तिनेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी कोणती असणार ?
४ आ. मोठ्या मुलीच्या विवाहानंतर ‘ती गुरुचरणांपासून दूर जाणार’, अशी काळजी वाटत असतांना तिच्या पोटी सात्त्विक मूल जन्माला आल्याने गुरुमाऊलीने तिच्या काळजीतूनही मुक्त करणे : पूर्वी मोठी मुलगी पुष्कळ सेवा करायची; परंतु तिचे लग्न ठरले आणि तिची सेवा पूर्णपणे थांबली. तिच्या घरी कशाचीच उणीव नव्हती; परंतु ‘मुलीला सेवा करता येत नाही. ती आता ‘गुरुचरणांपासून दूर जाणार’, अशी काळजी मला वाटत होती. गुरुमाऊलीच्या कृपेने तिला मुलगा झाला. तो ६ मासांचा होईपर्यंत हाताच्या बोटांची सतत ज्ञानमुद्रा (अंगठ्याच्या टोकाला तर्जनीचे टोक जुळवणे) करायचा. हे पाहून माझी सगळी काळजी दूर झाली.
४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने यजमानांची चालू झालेली साधना
४ इ १. यजमानांची साधना चालू व्हावी, यासाठी प.पू. गुरुमाऊलीला प्रार्थना करणे : माझ्या यजमानांचा (श्री. अशोक पैलवान यांचा) साधनेला पूर्ण विरोध नव्हता; परंतु ६ वाजता ते कार्यालयातून घरी येत, ‘तेव्हा मीही घरी यावे’, अशी त्यांची अपेक्षा असायची. मी शाळेत मुख्याध्यापिका असल्याने शाळेतील सगळे कामे संपवून घरी यायचे. नंतर घरातले सगळे आवरून मी सेवेला बाहेर पडायचे. सेवेतील आनंदामध्ये घरी जायला रात्री ९ वाजायचे. शेवटी मी प.पू. गुरुमाऊलीलाच प्रार्थना केली, ‘सेवेतून मला जो आनंद मिळतो, तो तुम्ही यजमानांनाही मिळवून द्या.’
४ इ २. सत्संगातील महिलांच्या पतींना संपर्क करण्यासाठी यजमानांना घेऊन जाणे, परतायला विलंब झाल्याने शेवटची बस निघून जाणे आणि ‘प.पू. गुरुदेवच आपली काळजी घेणार’, असे यजमानांना म्हटल्यावर चारचाकी गाडी घेऊन ‘बसस्टॉप’वर आलेल्या शेजारच्या गृहस्थांनी गाडीतून येण्यास सांगणे : एका रविवारी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून मी यजमानांना म्हटले, ‘‘आज सत्संगातील महिलांच्या पतींना भेटण्यासाठी जायचे आहे. मी अनोळखी स्त्री म्हटल्यावर ते बोलणार नाहीत. तुम्ही सोबत आलात, तर मलाही आणि त्यांनाही मोकळेपणाने बोलता येईल.’’ हे ऐकून प.पू. गुरुदेवांच्या कृपेने ते माझ्या समवेत आले. नंतर ‘संपर्कामध्ये वेळ कसा गेला ?’, हे दोघांनाही कळले नाही आणि रात्रीचे नऊ वाजले. त्या वेळी आम्ही जेथे रहात होतो, तिकडे रिक्शा जात नसत आणि शेवटची ९ वाजताची बसही निघून गेली होती. ‘आता ३ – ४ कि.मी. अंतर अंधारात चालत जावे लागणार’; म्हणून यजमान रागावले. मी शांतपणे एकच वाक्य बोलले, ‘‘आपण सेवेसाठी आलो आहोत, तर प.पू. गुरुदेवच आपली काळजी घेणार आहेत, याची निश्चिती बाळगा.’’ हे बोलणे होते ना होते, तोपर्यंत ‘बसस्टॉप’वर आमच्या शेजारचे गृहस्थ चारचाकी गाडी घेऊन आले आणि म्हणाले, ‘अहो, बस गेली. आता कशाची वाट पाहता ? बसा, गाडीत जागा आहे.’ मी यजमानांना म्हटले, ‘‘बघा, बसने तुम्हाला केवळ बसथांब्यापर्यंत सोडले असते; परंतु प.पू. गुरुदेवांनी घरापर्यंत गाडीची सोय केली.’’ या प्रसंगानंतर यजमानांचा विरोध मावळला.
ते स्वतः सेवा करायला लागले. त्यांनी जिल्ह्याचे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे दायित्व नोकरी करत सांभाळले.
५. कु. दीपाली मतकर (आताच्या पू. दीपाली मतकर) यांना सोलापूरला पाठवून गुरुमाऊलीने स्वभावदोष आणि अहं रूपी अडथळ्यावरही मात करायला शिकवणे
घरातील सर्वांचीच साधना चालू झाली; परंतु माझ्या साधनेतील सर्वांत मोठा अडथळा होता, माझे स्वभावदोष आणि अहं यांचा ! प.पू. गुरुमाऊलीने या ठिकाणीही मला अडखळू दिले नाही. आमच्यासाठी त्यांनी कु. दीपाली मतकर (आताच्या सनातनच्या ११२ व्या संत पू. (कु.) दीपाली मतकर) या साधिकेला सोलापूरला पाठवून त्यातूनही मला बाहेर काढले. दीपालीताई वारंवार आणि न थकता मला सांगते, ‘‘आपल्याला ‘हा साधक असा, तो तसा’, यांत अडकायचे नाही. सतत गुरुमाऊलीला शरण जाऊन त्यांच्या चरणी सद्गुणांची भिक्षा मागा.’’ ताई दूरभाष करून विचारते, ‘‘काकू, आनंदी आहात ना ?’’ ताईचा गोड आवाज ऐकला की, माझे मन मोराप्रमाणे आनंदाने नाचायला लागते. आम्ही आनंदी व्हावे; म्हणून ताई किती तळमळत आहे आणि आम्ही आमचे स्वभावदोष आणि अहं यांनाच पकडून बसलो आहे.
५ अ. प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कळवळून प्रार्थना होऊ लागणे आणि ती त्यांच्या चरणांपर्यंत पोचल्याची अनुभूतीही येणे : त्यानंतर माझ्या मनाला तळमळ लागली आणि प्रतिदिन प.पू. गुरुमाऊलींच्या चरणांशी कळवळून प्र्रार्थना होऊ लागली, ‘प.पू. गुरुदेव, स्वभावदोष आणि अहं यांमुळे मी तुमच्या चरणांशी येऊ शकत नाही. न मागताही तुम्ही मला सर्वकाही दिले. आता तुमच्याकडे एकच मागणे मागते, ‘माझ्यातील सारे स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊन तुमच्यातील ईश्वरी गुणांची भिक्षा माझ्या पदरात घाला. तुमच्या चरणांच्या प्राप्तीविना मला काहीही नको.’
या अज्ञानी जिवाची ही प्रार्थना गुरुमाऊलीने ऐकली. मला आणि माझ्या मुलीला एकाच दिवशी त्यांच्या चरणांशी घेतले. यापेक्षा मोठे भाग्य ते आणखी काय असणार ? म्हणूनच गुरुमाऊलींच्या चरणी म्हणावेसे वाटते,
‘कशी होऊ मी उतराई’ गुरुमाऊली तव चरणी ।
लीला अगाध घडविसी साधकांच्या जीवनी ।।
गाता येऊ दे तुझे गुणगान दशदिशांतूनी ।
हीच विनवणी करते पुनःपुन्हा तव चरणी ।।’
– सौ. लतिका अशोक पैलवान, फोंडा, गोवा.(वर्ष २०१८)
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |