देवगड तालुक्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना सद्गुरु सत्यवान कदम यांचा लाभलेला चैतन्यमय सत्संग !

‘गुरुमाऊलींच्या कृपेने २०.१०.२०२१ ते २.११.२०२१ या कालावधीत देवगड तालुक्यात सद्गुरु सत्यवान कदम यांच्या समवेत ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ आणि ‘संपर्क अभियान’ राबवण्याची अनमोल संधी आम्हाला मिळाली’, हे आम्हा साधकांचे परम भाग्य आहे. सद्गुरु सत्यवान कदम यांचा मला झालेला लाभ येथे दिला आहे.

सद्गुरु सत्यवान कदम

१. सद्गुरु सत्यवान कदम यांनी गुरुकृपायोगानुसार आणि काळानुसार साधना करण्याचे महत्त्व विशद करणे

१ अ. एका जिज्ञासूच्या घरी सद्गुरु सत्यवान कदम नामजपाचे महत्त्व सांगत असतांना त्यांच्या वयस्कर आईने विषय एकाग्रतेने आणि आनंदाने ऐकून घेणे अन् सद्गुरु दादांशी प्रेमाने बोलणे : एकदा आम्ही बुधवळे (तालुका देवगड) गावात वैयक्तिक संपर्कासाठी गेलो असता तेथे एका जिज्ञासूच्या घरी गेल्यानंतर सद्गुरु सत्यवानदादांनी त्यांना सांगितले, ‘‘कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करा.’’ आमचे बोलणे चालू असतांना त्यांच्या ९३ वर्षांच्या आई आतील खोलीतून बाहेर येऊन सर्व एकाग्रतेने ऐकत होत्या. त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद जाणवत होता. त्या वेळी ‘त्यांची कोणत्या तरी मार्गाने साधना चालू असावी’, हे आमच्या लक्षात आले. आम्ही तिथून निघतांना त्या आजी सद्गुरु दादांजवळ आल्या. आजी सद्गुरु दादांना नमस्कार करून त्यांचा हात हातात घेऊन म्हणाल्या, ‘‘आपण सांगत असलेल्या नामजपाचे महत्त्व पुष्कळ आहे. आज त्या नामजपाची सर्वांना आवश्यकता आहे.’’ आम्ही दरवाज्याच्या बाहेर आल्यावर आजीही बाहेर येऊन सद्गुरु दादांचा हात हातात घेऊन ‘आपण पुन्हा कधी येणार ?’, असे नम्रतेने विचारत होत्या. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर ‘सद्गुरु दादा जाऊच नयेत’, असा भाव होता. कदाचित् आजींच्या साधनेमुळे त्यांनी ‘सद्गुरु दादा कोण आहेत ? हे जाणले असावे’, असे आम्हाला वाटले.

१ आ. काळानुसार साधना करण्याचे लक्षात आलेले महत्त्व : आम्ही तिथून निघाल्यावर सद्गुरु दादांनी आम्हाला विचारले, ‘‘येथे तुम्ही काय शिकलात ? काय अनुभवलेत ?’’ तेव्हा सर्वांनी सांगितले, ‘‘आजींची साधना कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालू असावी.’’ हे ऐकून सद्गुरु दादा म्हणाले, ‘‘तुमचे योग्य आहे. आजींनी काळानुसार साधना न केल्याने किंवा स्वतःच्या मनाने साधना केल्यामुळे त्यांची या जन्मात अपेक्षित अशी आध्यात्मिक उन्नती झाली नाही.’’ नंतर सद्गुरु दादांनी ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याला काळानुसार साधना सांगून ती आपल्याकडून का करवून घेत आहेत ?’, याचे महत्त्व विशद केले. या प्रसंगातून आमची गुरुदेवांप्रती श्रद्धा दृढ झाली.

आधुनिक वैद्य रविकांत नारकर

२. सद्गुरु सत्यवान कदम यांची ‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ असणे

२ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी साधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजतेने देणे आणि त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून शेजारी बसून साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवणे : ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या कालावधीत प्रवासात सद्गुरु दादा आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हसतमुखाने आणि सहजतेने देत असत. त्या वेळी ‘गुरुदेवच आमच्या शेजारी बसून आम्हाला मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवून आम्हाला आनंद होत असे. आम्ही संपर्कासाठी जातांना प्रवासात सद्गुरु दादांना काही प्रश्न विचारत होतो, तसेच जिज्ञासूंच्या संपर्काच्या वेळी काही प्रश्न निर्माण झाले, तर पुढील प्रवासाच्या कालावधीत त्याविषयी सद्गुरु दादांना प्रश्न विचारल्यावर ते उदाहरणांसहित साध्या आणि सोप्या भाषेत उत्तरे देऊन आमचे शंकानिरसन करत असत. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर उत्साह, वात्सल्यभाव आणि आनंद जाणवत असे.

२ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची आवश्यकता साधकांच्या मनावर बिंबवणे : सद्गुरु दादा मार्गदर्शन करतांना आम्हा साधकांना ‘त्यांचे प्रत्येक वाक्य हृदयात साठवून ठेवावे’, असे वाटत असे. ‘सेवा करतांना झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सद्गुरु दादा आम्हाला सांगत असत. त्यांनी ‘स्वभावदोषांमुळे मनाची एकाग्रता होत नाही’, असे सांगून ‘आमच्या मनाची एकाग्रता साधली जावी’, यासाठी ते आमच्या मनावर वारंवार स्वभावदोष निर्मूलनाची आवश्यकता बिंबवत असत. ते प्रतिदिन रात्री घरी परतण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चुकांविषयी सांगत असत आणि त्या टाळण्यासाठी कोणते प्रयत्न करायचे ?’, तेही प्रेमाने सांगत असत. दादांचे आमची साधना होण्याकडे लक्ष असे. त्यामुळे साधकांची व्यष्टी साधना नियमितपणे होऊ लागली. या वेळी ‘साक्षात् गुरुदेवच आमच्याजवळ बसून आम्हाला मार्गदर्शन करत आहेत’, असा सर्व साधकांचा भाव होता.

२ इ. ‘गुरुदेवांनी दिलेली सेवा, म्हणजे एक प्रकारचा प्रसादच आहे’, या भावाने सेवा करण्यास सांगणे : ते साधकांकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करवून घेण्याचे प्रयत्न करत. ते साधकांना ‘गुरुदेवांनी आपल्याला दिलेली सेवा म्हणजे एक प्रकारचा प्रसादच आहे’, या भावाने सेवा करायला सांगत. ‘आमच्याकडून या भावाने सेवा नियमितपणे कशी होईल ? त्यातील सातत्य कसे टिकेल ? त्यातून काय शिकायला मिळाले ?’, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे’, असेही ते मार्गदर्शनात सांगत. सेवेशी, म्हणजेच पर्यायाने गुरुदेवांशी एकरूप झालेल्या सद्गुरु सत्यवानदादांना आम्हाला ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, असे अनुभवता आले.

३. गुरुकार्याशी एकरूप होऊन गुरूंचे कार्य प्रत्येक घरात पोचवण्याची सद्गुरु सत्यवान कदम यांची तळमळ

‘सद्गुरु दादा गुरुकार्याशी एकरूप होऊन गुरूंचे कार्य प्रत्येक घरी कसे पोचेल ?’, याचे सतत चिंतन करत असत. प्रतिदिन रात्री सत्संग झाल्यानंतर ‘उद्या कशा प्रकारे नियोजन आहे ? किती जणांना भेटायचे आहे ? आवश्यक तेवढे ग्रंथ, सनातन पंचांग आदी साहित्य समवेत आहेत ना ?’ इत्यादी सर्व गोष्टींची माहिती जाणून घेत असत. ते नियोजनात आवश्यकतेनुसार पालटही करत असत. कितीही लांब अंतरावर जायचे असले, तरी दादा म्हणायचे, ‘‘हो. आपल्याला तेथे गेलेच पाहिजे.’’

४. कृतज्ञता

गुरुदेवांनी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या माध्यमातून आम्हाला साधनेला आवश्यक असे पुष्कळ काही शिकवून चैतन्य आणि शक्ती पुरवली. त्यासाठी गुरुदेव आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– आधुनिक वैद्य रविकांत नारकर, पडेल, देवगड, सिंधुदुर्ग. (१५.११.२०२१)