क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये !

हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन !

हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ? – संपादक 

प्रजासत्ताकदिनी मालाड येथे टिपू सुलतानाचे नाव दिलेल्या मैदानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (सौजन्य: हिंदुस्थान पोस्ट)

मुंबई, २५ जानेवारी (वार्ता.) – हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला दिले, तर उद्या औरंगजेब, बाबर, खिलजी, महंमद गझनी, महंमद घोरी, तैमूरलंग, तुघलक आदी क्रूर मोगलांची नावे देण्याची मागणी पुढे येऊ शकते. त्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे मंत्रालयात दिले आहे. या निवेदनावर विक्रोळी येथील श्रीशिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, धारावी येथील श्रीराम गणेश मित्रमंडळाचे श्री. कांतीलाल पटेल, हिंदु राष्ट्र सेना महामुंबईचे अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, तसेच श्री. साहिल जाधव  आदींनी स्वाक्षरी केली आहे. या निवेदनाची प्रत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावेही देण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. मुंबईतील विविध स्थळांना विविध जाती-पंथांतील महनीय व्यक्तींची नावे आहेत. त्यांना  आम्ही कधीही विरोध केला नाही; मात्र ज्याने दक्षिण भारतातील हिंदूंची १ सहस्र मंदिरे पाडली, लाखो हिंदूंच्या हत्या केल्या, लाखो हिंदु महिलांवर अत्याचार केले, तसेच तलवारीच्या बळावर लाखो हिंदूंचे धर्मांतर केले, अशा क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव मुंबईतील क्रीडासंकुलाला देणे, हे हिंदूंच्या भावना दुखावण्यासारखे आहे. हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. हिंदु समाज हे कदापि सहन करणार नाही.

२. सर्व धर्मांना समान वागणूक देऊन आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे ? आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान कुठे ? हा भेद सरकारला करता यायला पाहिजे.

३. महाराष्ट्र क्रूर मोगलांच्या अत्याचाराने त्रस्त असतांना छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेचे रक्षण केले. मंदिरांचा जीर्णोद्धार आणि माता-भगिनींचे शीलरक्षण केले. त्याच्या अगदी उलट वर्तन क्रूर टीपू सुलतानने केलेले आहे.

४. त्यामुळे हा केवळ हिंदु समाजाचा नव्हे, तर महाराष्ट्र घडवणार्‍या छत्रपती शिवरायांचाही अवमान आहे. त्यामुळे अशा अत्याचारी टिपू सुलतानचे नाव एका उद्यानाला कदापि देऊ नये. उद्यानाला त्याचे नाव दिले, तर त्याच्या अत्याचाराला समर्थन आणि प्रोत्साहन दिल्यासारखे होईल.

५. मुंबईचा एकोपा आणि सर्वधर्मसमभाव अबाधित रहाण्यासाठी या क्रीडासंकुलाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव देता येईल; मात्र क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध होईल, तसेच समस्त हिंदु समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.