अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर कारवाई करण्याची कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावर कारवाई का करत नाहीत ? कारवाई न करण्यामागे लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर दबाव असतो किंवा त्यांचे स्वतःचे आर्थिक हितसंबंध असतात, असेच त्यामुळे जनतेला वाटते ! – संपादक 

ठाणे, २१ जानेवाारी (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात अनधिकृतरित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कल्याण येथील अपर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी एक पथक सिद्ध करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन कल्याण पोलिसांकडून देण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या क्षेत्रात या धर्मांधांकडून मांस विक्रीची अनधिकृत दुकाने थाटली जात असून जनावरांच्या हत्येविषयी, तसेच त्यापासून निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याविषयी महानगरपालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होते, असे हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलास जाधव, हिंदु युवा वाहिनीचे विलास खंडागळे, श्रीराम हिंदु सेनेचे अनिल जयस्वाल आणि भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी कल्याण पोलिसांना भेटून धर्मांध घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.