६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. विश्वजा सतीश माने (१२ वर्षे) !

‘कु. विश्वजा सतीश माने महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून वर्ष २०१७ मध्ये ती ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पौष शुक्ल पक्ष द्वादशी (१४.१.२०२२) या दिवशी ठाणे येथील कु. विश्वजा सतीश माने हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे कुटुंबीय आणि साधक यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये अन् तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. विश्वजा माने

कु. विश्वजा सतीश माने हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

सौ. सारिका माने (कु. विश्वजाची आई), ठाणे

१. नम्रता : ‘विश्वजा मोठी झाल्यावरही तिच्या स्वभावदोषांत वाढ झाली नाही. तिच्यातील ‘आज्ञापालन करणे, निरागसता आणि परेच्छेने वागणे’ हे गुण तसेच आहेत. तिची चूक नसतांना मी तिच्यावर रागावले, तरी ती शांतच असते. तिने मला कधीच उलट उत्तर दिले नाही.

सौ. सारिका माने

२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

अ. वर्ष २०१८ ते २०१९ या वर्षात विश्वजाची व्यष्टी साधना चालू होती. वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्या, तसेच घराबाहेर पडणे आणि खेळणेही बंद झाले. त्या कालावधीत तिच्या व्यष्टी साधनेत वाढ झाली.

आ. ती प्रत्येक बालसंस्कारवर्गात उपस्थित असते. ती प्रतिदिन तिचा व्यष्टी साधनेचा आढावा बालसंस्कारवर्ग घेणार्‍या ताईला पाठवते. तिचा आढावा पाहून बालसंस्कारवर्ग घेणारी ताई विश्वजाला ‘ती व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करते ?’, ते वर्गात सर्वांना सांगायला सांगते आणि तिचे कौतुकही करते.

३. साधनेची तळमळ आणि सातत्य : वर्ष २०२० ते २०२१ या वर्षात शाळा नसल्याने ती प्रतिदिन नियमितपणे सकाळी ९.३० वाजता नामजपादी उपाय आणि कोरोनाच्या विरोधात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून सांगितलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा, ‘ॐ नमः शिवाय ।’ १ वेळा, ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ १ वेळा असा नामजप करते. ती प्राणशक्तीवहन पद्धतीने नामजपही लगेच शोधते. ती भावपूर्ण नामजप करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिला नामजप करतांना चांगल्या अनुभूती येतात.

४. संतसेवा मिळाल्यावर आनंद होणे : वर्ष २०२१ मध्ये गणेशोत्सवासाठी विश्वजाचे वडील गावाला जाणार होते. त्या काळात आम्ही दोघी ठाणे सेवाकेंद्रात रहायला गेलो. तिथे गेल्यावर विश्वजाला सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा मिळाल्याचे कळल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला.

५. सद्गुरु अनुताईंनी तिचे अनेक वेळा कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘ती अल्प कालावधीत पुष्कळ काही शिकते.’’

६. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : तिची भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती अपार श्रद्धा आहे. ती सतत त्यांच्या अनुसंधानात असते. स्वतःच्या संदर्भात कुठलेही चांगले-वाईट प्रसंग घडल्यास ती आधी सूक्ष्मातून श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांना सांगते अन् ‘ते तिच्याशी बोलतात’, अशी तिला अनुभूती येते.

७. कु. विश्वजाला आलेल्या अनुभूती

७ अ. स्वप्नात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आशीर्वाद दिला’, असे दिसणे : एप्रिल २०१७ मध्ये कु. विश्वजाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले. त्या दिवशी सकाळीच तिला स्वप्नात दिसले होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सिंहासनावर बसले आहेत. त्यांच्या एका बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्‍या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उभ्या आहेत. ते तिघे जण आकाशातून खाली तिला आशीर्वाद द्यायला आले असून तिघांनी तिला जवळ घेऊन भरभरून आशीर्वाद दिले.’

७ आ. ध्यानात ‘स्वतः आणि मावस बहीण आधीच्या जन्मात एका आश्रमात एकत्र रहात होत्या’, असे दिसणे : ‘विश्वजाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, हे कळण्याआधी ‘ती अन्य मुलांपेक्षा वेगळी आहे. तिच्यात फारसे स्वभावदोष नाहीत’, असे मला जाणवायचे. तिची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर मी तिच्या गुणांकडे अधिक लक्ष देण्यास आरंभ केला. एकदा मी तिला सहजच म्हणाले, ‘‘जरा ध्यान लावून बस.’’ तेव्हा तिला ध्यानात ‘ती आणि तिची मावस बहीण (माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी कु. राधिका पाटील) आधीच्या जन्मात एका आश्रमात एकत्र रहात असून दोघींनी भगवी वस्त्रे परिधान केली आहेत आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत’, असे दृश्य दिसले.

७ इ. नामजप करत असतांना डाव्या हातावर सूक्ष्मातून श्रीकृष्णाचा स्पर्श जाणवणे : एकदा सकाळी झोपेतून उठल्यावर तिच्या पोटात पुष्कळ दुखत होते; म्हणून ती उजव्या कुशीवर झोपून पोटदुखी थांबण्यासाठी नामजप करत होती. त्या वेळी ‘तिच्या डाव्या हातावर कुणीतरी हात फिरवत आहे’, असे तिला ४ – ५ वेळा जाणवले. ‘प्रत्येक वेळी कोण हात फिरवत आहे ?’, हे पाहिल्यावर तिला कुणीच दिसले नाही. नंतर ती अंघोळीला गेल्यावर तिला तिच्या डाव्या हातावर ३ – ४ दैवी कण दिसले. तेव्हा तिच्या लक्षात आले, ‘तिला बरे वाटावे’, यासाठी श्रीकृष्ण तिला मायेने स्पर्श करून गेला.’ तेव्हा तिची पुष्कळ भावजागृती झाली.

७ ई. नवरात्रीनिमित्तच्या भक्तीसत्संगात देवींचे दर्शन होणे

७ ई १. भक्तीसत्संग ऐकत असतांना ‘सक्ष्मातून दुर्गादेवी समोर उभी आहे आणि सर्व साधकांना आशीर्वाद देत आहे’, असे दिसणे : नवरात्रीनिमित्त पहिल्या दिवशीच्या भक्तीसत्संगात ‘आता प्रत्यक्ष दुर्गादेवी आपल्या समोर येणार आहे’, असे सांगण्यात आले होते. तेव्हा सत्संगात पैजणांचा ध्वनी लावण्यापूर्वीच विश्वजाला श्री दुर्गादेवीच्या पैजणांचा आवाज ऐकू आला. तिने डोळे उघडल्यावर तिला सूक्ष्मातून दिसले, ‘दुर्गादेवी समोर उभी आहे. तिच्या हातात शस्त्रे आहेत. तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. देवी आशीर्वादरूपी हात वर करून सर्व साधकांना आशीर्वाद देत आहे. देवीच्या हातातून पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत आहे आणि सद्गुरु अनुराधाताईंच्या खोलीतून गुलाबी प्रकाश येत आहे.’ ‘देवीकडून प्रक्षेपित होणारा पिवळा प्रकाश चैतन्याचा आणि सद्गुरु अनुताईंच्या खोलीतून प्रक्षेपित होणारा गुलाबी प्रकाश प्रीतीचा स्रोत आहे’, असे तिला जाणवले.

७ ई २. भक्तीसत्संगात ‘रेणुकामाता आपल्याजवळ येत आहे’, असे सांगितल्यावर ‘देवीने तिच्या डोक्यावरून ३ वेळा हात फिरवला’, असे जाणवणे : भक्तीसत्संगाच्या दुसर्‍या दिवशी तिला पैजणांचा आवाज येत होता आणि ‘देवी तिच्या जवळ येत आहे’, असे तिला जाणवले. तिने मला सांगितले, ‘‘रेणुकामाता आपल्याजवळ येत आहे.’’ त्यानंतर ‘देवी तिच्या जवळ आली आणि देवीने तिच्या डोक्यावरून ३ वेळा हात फिरवला’, असे तिला जाणवले.

८. विश्वजाचे स्वभावदोष : ‘भावनाशीलता आणि विसराळूपणा’ – सौ. सारिका माने

सौ. कविता पाटील (कु. विश्वजाची मावशी)

सौ. कविता पाटील

आनंदी आणि समाधानी वृत्ती : विश्वजा सतत आनंदी असते. ती कधीच कुठल्याच गोष्टीचा हट्ट करत नाही. ती जे आहे, त्यात समाधानी असते आणि परिस्थितीशी जुळवून घेते.

कु. केतकी शिंपी, ठाणे सेवाकेंद्र (साधिका)

आध्यात्मिक त्रासावर मात करून उत्साहाने सेवा करणे : ‘एकदा मला आणि विश्वजाला ठाणे सेवाकेंद्रातील संत कक्षातील सेवा करायची होती. सेवा करतांना आम्हा दोघींनाही आध्यात्मिक त्रास होत होता. मला त्या त्रासावर मात करून सेवा करायला जमत नव्हते; पण ती त्रासावर मात करून सेवा करत होती. तिला बघून मलाही उत्साह वाटला आणि मीही सेवा केली.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २०.११.२०२१)