कुणकेरी गावातील रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांचे तिसर्‍यांदा आंदोलन चालू

सतत मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसेल, तर शासन ग्रामस्थांनी कायदा हातात घ्यावा, याची वाट पहात आहे का ? कि ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे ? – संपादक 

सावंतवाडी – तालुक्यातील कुणकेरी गावातील वर्ष २०१९ मध्ये संमत झालेल्या रस्त्याचे काम पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी १० जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण चालू केले आहे.

गावातील या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे पादचारी आणि वाहनधारक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून काम पूर्ण करावे, यासाठी अनेक वेळा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या वेळकाढू धोरणामुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या कामासाठी आता तिसर्‍यांदा आंदोलन करावे लागत आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. ‘जोपर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे.

या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (जिल्हा बँकेचे) संचालक महेश सारंग, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत, कुणकेरीचे सरपंच विश्राम सावंत, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावले, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.