ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

सेवाभावी वृत्ती असणारी आणि ‘याच जन्मी आयुर्वेदाची सेवा करण्याची संधी मिळावी’, यासाठी प्रार्थना करणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !

कु. प्रार्थना महेश पाठक

१. लहानपणापासून प्रार्थनाला धन्वन्तरिदेवता आवडत असणे

‘प्रार्थना २ वर्षांची असल्यापासून तिला धन्वन्तरिदेवता आवडते. धन्वन्तरिदेवतेची मूर्ती अथवा चित्र पाहिल्यावर तिला आनंद होतो. प्रार्थना ४ वर्षांची असतांना मी आणि प्रार्थना एका शिबिरासाठी रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या कालावधीतही ती तेथील वैद्यांकडे जाऊन ‘वैद्यांच्या सेवा कशा चालतात ?’, हे पहात असे.

२. प्रेमभाव

२ अ. वयाने लहान असूनही इतरांची प्रेमाने विचारपूस करणे : लहानपणापासून प्रार्थना कधीही रुग्णाईत असल्यास आम्ही तिला पुण्यातील एका बालरोगतज्ञांकडे उपचारांसाठी घेऊन जायचो. ते बालरोगतज्ञ जैन संप्रदायाचे आणि सात्त्विक वृत्तीचे आहेत. ते प्रार्थनाला ‘तुला काय होत आहे ?’, असे प्रेमाने विचारून तिला तपासायचे. तेव्हा प्रार्थनाही त्यांची ‘तुम्ही कसे आहात ?’, अशी आपुलकीने विचारपूस करायची. (त्या वेळी ती ४ वर्षांची होती.) ‘वयाने लहान असूनही प्रार्थना इतरांची किती प्रेमाने विचारपूस करते ?’, याचे त्या बालरोगतज्ञांना पुष्कळ कौतुक वाटत असे.

२ आ. चिकित्सालयात येणार्‍या रुग्ण साधकांना साहाय्य करणे : प्रार्थना ८ – ९ वर्षांची असतांना रामनाथी आश्रमात वास्तव्यास होती. त्या वेळी तिला वैद्यांकडे चालणार्‍या सर्व सेवा आवडत असत. तिला वैद्य साधकांविषयी आपुलकी वाटते. त्यांच्याकडे येणार्‍या रुग्ण साधकांना ती स्वतःहून साहाय्य करायची. त्या सेवेतून तिला पुष्कळ आनंद मिळत असे.

सौ. मनीषा पाठक

३. आईला रुग्णालयात भरती केल्यावर लहान असूनही प्रार्थनाला रुग्णालयातील वातावरणाची भीती न वाटणे आणि तिने आईला रुग्णांना साधना सांगण्यास सांगणे

प्रार्थनाला रक्त दिसल्यास किंवा तिने अपघात पाहिल्यास तिला भीती वाटत नाही. मागील काही वर्षांत मला २ – ३ वेळा पुणे येथील नवले रुग्णालयात भरती केले होते, तसेच त्यापूर्वीही मला अन्य रुग्णालयांतही विविध शारीरिक त्रासांसाठी भरती केले होते. त्या वेळी त्या रुग्णालयांतील वातावरण पाहून प्रार्थनाला भीती वाटत नसे. तिला त्याविषयी विचारल्यावर ती सांगायची, ‘‘आई, आपत्काळात सगळीकडे असेच वातावरण असणार ना ? आपण घाबरायला नको. या सगळ्यांना (अन्य रुग्णांना) आपण नामजप करायला सांगूया.’’ तिला कधीकधी माझ्या समवेत रुग्णालयात थांबावे लागायचे. ‘रुग्णालयात थांबून ती कधी कंटाळली आहे’, असे झाले नाही. तिथेही ती अभ्यास करायची.

४. विविध उपचारपद्धती आणि सेवा शिकण्याची आवड

४ अ. प्रथमोपचार शिकणे

४ अ १. प्रथमोपचारवर्गात शिकवली जाणारी प्रात्यक्षिके आणि सांगितले जाणारे विषय लक्षपूर्वक ऐकणे : प्रथमोपचार वर्गात शिकवली जाणारी प्रात्यक्षिके स्वतः करून बघण्याकडे तिचा कल होता. प्रार्थना ६ – ७ वर्षांची असतांना ‘ऑनलाईन’ प्रथमोपचारवर्ग घेण्यात येत होता. त्या वेळी ती त्या वर्गाला आवर्जून उपस्थित रहात असे. प्रथमोपचाराविषयी दाखवली जाणारी माहितीपर चलचित्रे (व्हिडिओ) किंवा सांगितली जाणारी सूत्रे ती लक्षपूर्वक ऐकत असे.

४ अ २. प्रथमोपचार अंतर्गत येणार्‍या प्रत्यक्ष कृतींसाठीची सिद्धता करता येणे : प्रथमोपचारामध्ये ‘गॉज बँडेज’ सिद्ध करणे, त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने हाताचे ‘बँडेज’ (हाताची झोळी) सिद्ध करणे, डोक्याला मार लागल्यानंतर डोक्याचे ‘बँडेज’ सिद्ध करणे, ‘स्ट्रेचर’ इत्यादी सर्व ती चांगल्या पद्धतीने बनवते. सनातनचे प्रथमोपचारविषयीचे सर्वच ग्रंथ तिने वाचले आहेत आणि त्यांचा अभ्यासही केला आहे.

४ आ. बिंदूदाबन उपचारपद्धती जिज्ञासेने शिकून घेणे : वर्ष २०२० मध्ये बिंदूदाबन उपचाराविषयी काही अभ्यासवर्ग घेण्यात आले होते. प्रार्थना त्या वर्गांतही आवर्जून बसत असे. सौ. काव्या चेऊलकर या बिंदूदाबन शिकल्या होत्या. त्या आमच्या खोलीत आल्यानंतर प्रार्थना त्यांना प्रश्न विचारून बिंदूदाबनाचा सराव करत असे.

४ इ. नवीन उपचारपद्धती शिकणे : तिचा नवीन उपचारपद्धती शिकण्याकडे कल असतो. नाडी तपासणे, मर्दन करणे, रुग्णांवर जळूचे उपचार करणे, ‘मॅग्नेट थेरपी’ आदी उपचार तिने शिकून घेतले आहेत. कोणतेही नवीन सूत्र शिकले की, ती ते सूत्र वहीत लिहून ठेवते.

५. सेवा करतांना भाव ठेवणे

५ अ. रुग्ण साधकांना औषधे पोचवतांना ‘साधकांना चैतन्य देत आहे. परात्पर गुरुदेव आणि कृष्ण यांचे चैतन्य औषधांमध्ये आहे’, असा भाव ठेवणे : प्रार्थना ‘रुग्ण साधकांना औषधे पोचवणे आणि रुग्णांना छोट्या पुड्या बनवून देणे’, या सेवा करतांना ‘साधकांना चैतन्य देत आहे. परात्पर गुरुदेव आणि कृष्ण यांचे चैतन्य औषधांमध्ये आहे’, असा भाव ठेवते. आयुर्वेदिक काढे, आयुर्वेदिक औषधांचे वास, ‘ॲलोपॅथी’ औषधे यांविषयी तिला वेगळे काही वाटत नाही. जुन्या औषधांच्या बाटल्या धुणे आणि त्या स्वच्छ करून ठेवणे इत्यादी सेवा करतांना तिला पुष्कळ उत्साह असतो. एकदा ती मला म्हणाली, ‘‘आई, आपत्काळात ‘अन्नपूर्णाकक्ष आणि वैद्य साधकांची सेवा’ निश्चितपणे चालू राहील.’’

५ आ. आजारी व्यक्तीची सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे : ‘कोणत्याही आजारी व्यक्तीची सेवा करतांना तिचा ‘परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करत आहे आणि त्यातून माझी साधना होत आहे’, असा भाव असतो. मला विविध चाचण्यांसाठी रुग्णालयात जावे लागायचे. तेव्हाही ती कधी कंटाळली नाही किंवा ‘मी येत नाही’, असे मला म्हणाली नाही.

६. गुणग्राहकता

प्रार्थनाने वैद्य साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आवर्जून लिहून दिली आहेत.

‘याच जन्मी आयुर्वेदाची सेवा करण्याची संधी मिळावी’, यासाठी प्रार्थना करणारी कु. प्रार्थना !

‘परात्पर गुरुदेव, मला या जन्मी आयुर्वेदाची सेवा करण्याची संधी मिळेल का ? धन्वन्तरि देवतेची सेवा करता येईल ना ? ही सेवा मला शिकता येऊ दे’, अशी ती सतत प्रार्थना करत असते.’

– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) (कु. प्रार्थनाची आई), पुणे (५.१०.२०२१)