वयाच्या ७७ व्या वर्षीही घरातील विविध कामे करणार्‍या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या गडहिंग्लज येथील श्रीमती सुशिला कडूकरआजी !

वयाच्या ७७ व्या वर्षीही तरुणांना लाज वाटेल अशी घरातील विविध कामे करणार्‍या, तसेच मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुशिला कडूकरआजी !

श्रीमती सुशिला कडूकर

१. धीटपणा आणि वृद्धावस्थेतही घरातील सर्व कामे करणे

‘आई (सासूबाई) एकट्याच घरामध्ये रहातात; पण त्यांना कधीच भीती वाटत नाही. त्या वयाच्या ७७ व्या वर्षीही ६ खोल्यांचे घर आणि घराबाहेर असलेली २ गुंठे मोकळी जागा नेहमी स्वच्छ ठेवतात. मी ८ दिवसांनी घरी गेल्यावर बाजारातून भाज्या, धान्य इत्यादी आणते. तेव्हा त्या सर्व भाज्या निवडून शीतकपाटात ठेवणे, धान्य निवडून दळून आणणे, धान्य चाळून त्याला पावडर लावणे इत्यादी घरगुती कामे पूर्ण करतात. आईंनी घराजवळच्या मोकळ्या जागेत आंबा, चिकू आणि लिंबू यांसह औषधी वनस्पतीही लावल्या आहेत.

२. मुलगा आणि सून यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणे

अ. माझे पती आधुनिक वैद्य बाबूराव कडूकर देवद येथील सनातन आश्रमामध्ये असतात. मीही सेवा करत असल्यामुळे आठवडाभर घराबाहेरच असते. त्यांनी मला आणि डॉ. कडूकर यांना कधीही साधनेला विरोध केला नाही, उलट प्रोत्साहनच दिले. त्यामुळे मीही दायित्व घेऊन सेवा करू शकते.

आ. पूर्वी माझ्याकडे ३ जिल्ह्यांची सेवा असल्याने मी आठ दिवसांनंतर घरी जात होते. सध्या मी सेवेसाठी चौथ्या जिल्ह्यातही जायला लागले. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘मी काय करू ?’’ त्यावर त्यांनी आनंदाने सांगितले, ‘‘मला काहीच अडचण नाही. तू दायित्व घेऊन पुढे जा.’’

. त्यांनी कधीच आम्हाला ‘तुम्ही व्यवहारात काय करता ?’, असे विचारले नाही. त्या आम्हाला म्हणतात, ‘माझा तुमच्यावर विश्वास आहे.’

३. प्रेमभाव

मी आश्रमामध्ये जातांना सासूबाई साधकांसाठी शेंगदाण्याच्या पोळ्या, ओल्या मिरचीचा ठेचा इत्यादी पदार्थ प्रेमाने करून पाठवतात. परसातील केळी, लिंबू, तसेच भाजीच्या शेंगाही त्या साधकांसाठी पाठवतात आणि शेजारीही सर्वांना वाटतात.

सौ. संगीता कडूकर

४. परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणे

वर्ष २००१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्या घरी येऊन गेले. तेव्हापासून त्या घरामध्ये त्यांचे अस्तित्व आहे. ‘ते घराजवळच्या बागेत फिरले; म्हणून सर्व झाडांना फळे लागतात’, अशी त्यांची श्रद्धा आहे. आई घरातील पूजा प्रतिदिन भावपूर्ण करतात. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांना कसलीही भीती वाटत नाही. त्यांना रक्तदाब आणि दम्याचा त्रास आहे; म्हणून मला त्यांची काळजी वाटते. त्याविषयी त्या नेहमी म्हणतात, ‘परात्पर गुरु डॉक्टर (सूक्ष्मातून) माझ्याजवळ बसले आहेत. त्यामुळे मला काळजी नाही. आता मला काही नको. मी नामस्मरण करत बसते.’

‘आईंसारख्या साधनेसाठी साहाय्य करणार्‍या सासूबाई सर्वांना मिळो’, अशी मी देवाचरणी प्रार्थना करते.’

– सौ. संगीता कडूकर(आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), गडहिंग्लज, कोल्हापूर. (फेब्रुवारी २०१९)