सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) – अखिल भारतीय ‘फिंगरप्रिंट’ परीक्षेत सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका मारुति संकपाळ यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. देहली येथील ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ यांच्या वतीने ४ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत अखिल भारतीय ‘फिंगरप्रिंट’ परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत प्रियांका संकपाळ यांनी २५० पैकी २२४ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अशा प्रकारच्या बहुमान मिळवणार्या त्या महाराष्ट्राच्या प्रथम महिला अधिकारी ठरल्या आहेत. ‘फिंगरप्रिंट’ विभागाची मानाची समजली जाणारी ‘अजीज-उल-हक’ ट्रॉफी संकपाळ यांनी २० वर्षांनंतर महाराष्ट्राला मिळवून दिली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.