काशी विश्‍वनाथ धामच्या लोकार्पणाच्या वेळी मंदिराच्या पुजार्‍याने सुतक असतांना पंतप्रधान मोदी यांना पूजा सांगितल्याचे उघड !

प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर चौकशी चालू !

ही माहिती खरी असल्यास हे प्रकरण गंभीर आहे, असेच हिंदूंन वाटते; कारण जर मंदिरातील पुजारीच धर्मपालन करत नसतील, तर हिंदूंना दिशादर्शन कोण करणार ? – संपादक

पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी विश्‍वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सुतक असतांना काशी विश्‍वनाथाच्या गर्भगृहामधील श्रीकांत मिश्रा या पुजार्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूजा सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मंदिराशी संबंधित पदाधिकार्‍यांनी आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी चालू करण्यात आली आहे.

१. श्रीकांत मिश्रा यांचा पुतण्या वेद प्रकाश मिश्रा याचा ५ डिसेंबर या दिवशी एका अपघातामध्ये मृत्यू झाला. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच वेद प्रकाश मिश्रा याच्या तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर सर्व प्रकरण समोर आले. याविषयी सर्वांत पहिली तक्रार श्री काशी विश्‍वनाथ मंदिर न्यासाचे माजी सदस्य प्रदीप कुमार बजाज यांनी केली आहे. बजाज यांनी सर्व पुरावे आणि कागदपत्र यांसहित पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अन् संबंधित अधिकारी यांना यासंदर्भातील लेखी तक्रार केली आहे.

२. बजाज यांनी सांगितले की, वेद प्रकाश याचा मृत्यू ५ डिसेंबरला झाल्यावर ६ डिसेंबरला त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर १० दिवस सुतक पाळले जाते. त्यामुळे ६ डिसेंबरपासून १० दिवस श्रीकांत मिश्रा यांना सुतक लागले होते. तरीही त्यांनी १३ डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विश्‍वनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये पूजा सांगितली. मिश्रा यांनी ही पूजा सांगायला नको होती. मिश्रा यांनी सुतक असतांना मंदिरामध्येही प्रवेश करायला नको होता. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बजाज यांनी केली आहे.

३. काशी विश्‍वनाथ मंदिराचे विशेष कार्याधिकारी उमेश सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये पुजारी मिश्रा यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. यासंदर्भात कुणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

सुतक म्हणजे काय ?

हिंदु धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबातील व्यक्तींना पुढील १० दिवसांसाठी सुतक असते. या कालावधीमध्ये मृत व्यक्तीच्या घरातील व्यक्ती मंदिरांमध्ये, तसेच अन्य कुणाच्या घरातही जात नाही. या कालावधीत देवाची पूजाही केली जात नाही.