मुख्य सूत्रधार जसविंदर सिंह मुलतानी याला जर्मनीमध्ये अटक

लुधियाना बाँबस्फोट प्रकरण

जसविंदर सिंह मुलतानी

नवी देहली – पंजाबच्या लुधियाना येथील न्यायालयात बाँबस्फोट घडवल्याच्या प्रकरणी जर्मनीतून जसविंदर सिंह मुलतानी या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांचा बडतर्फ हवालादार हा येथे बाँब जोडत असतांना झालेल्या स्फोटात ठार झाला होता. या बाँबस्फोटाची योजना पाक गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि पाकिस्तानचा गुंड हरविंदर सिंह रिंदा यांनी आखली होती.

१. जसविंदर सिंह मुलतानी लुधियाना आणि देशातील इतर शहरांमध्ये बाँबस्फोट घडवून आणणार्‍या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संस्थेचा सक्रीय सदस्य आहे. मुलतानी देहली आणि मुंबई येथेही बाँबस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खलिस्तान समर्थक असण्यासमवेतच मुलतानीवर पंजाब सीमेवरून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी केल्याचाही आरोप आहे. जसविंदर सिंह मुलतानी हा पंजाबमधील होशियारपूर येथील मुकेरियाचा रहिवासी आहे. वर्ष १९७६ ला जन्म झालेल्या मुलतानीला २ भाऊ असून दोघेही जर्मनीत दुकान चालवतात. मुलतानी पाकिस्तानात गेला होता कि नाही, याविषयी अन्वेषण यंत्रणा त्याच्याकडे चौकशी करत आहेत. सध्या जर्मनीतील यंत्रणा मुलतानीची चौकशी करत आहेत. मुलतानीची चौकशी करण्यासाठी भारतीय अन्वेषण यंत्रणा लवकरच जर्मनीला जाऊ शकतात.

२. दुसरीकडे पाकिस्तानचा गुंड हरविंदर सिंह रिंदा हा पंजाब, हरियाणा, बंगाल आणि महाराष्ट्र येथील गुन्ह्यांमध्ये पसार आहे. त्याच्यावर १० हत्या, ६ हत्येचे प्रयत्न आणि ७ दरोडे, शस्त्र कायदा, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी अशा प्रकारे एकूण ३० गुन्हे नोंद आहेत. वर्ष २०१७ मध्ये रिंदा हा पोलिसांच्या हातून निसटला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात गेल्याचे निष्पन्न झाले होते.