हुमरमळा येथे मद्यासह २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

(प्रतिकात्मक चित्र)

सिंधुदुर्ग – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यातून अवैधरित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला आहे. या वेळी मद्य आणि कंटेनर यांसह २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला.

३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांचे पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी हुमरमळा येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर उभा असल्याचे दिसले. त्या कंटेनरची तपासणी केली असता त्यात चालक अथवा त्याचा साहाय्यक कुणीही नव्हते. त्यामुळे ४ ते ५ घंटे या कंटेनरवर पोलिसांनी नजर ठेवली; मात्र कंटेनर नेण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर कह्यात घेऊन पंचांसमक्ष तो उघडला असता त्यात गोवा बनावटीच्या मद्याचे अडीच ते ३ खोके सापडले.

इन्सुली येथे ४४ लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एकाला अटक

सावंतवाडी – तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथे असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर गोवा राज्यातून आलेल्या एका ट्रकमधून पोलिसांनी ४४ लाख ६१ सहस्र ३६० रुपये किमतीच्या मद्यासह तब्बल ६४ लाख ७१ सहस्र ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी ट्रकचा चालक पंजाबराव बाबुराव लोखंडे (वय ४९, साईनगर, नागपूर) याला अटक करण्यात आली आहे.