यजमानांच्या आजारपणाच्या कालावधीत त्यांची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

ऑक्टोबर २०२० मध्ये सौ. समिधा पालशेतकर यांचे पती श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म झाले. त्यांच्या रुग्णाईत स्थितीमध्ये त्यांना साहाय्य करत असतांना सौ. समिधा यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. संजय आणि सौ. समीधा पालशेतकर

१. ‘अर्धांगवायू’ या व्याधीविषयी शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. मेंदूमध्ये झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे यजमानांना अर्धांगवायू होणे : ‘श्री. संजय यांना मेंदूमध्ये झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे अर्धांगवायू झाला. त्यांच्या मेंदूची हानी झाल्यामुळे त्यांच्या मेंदूतील पेशी मृत झाल्या. त्याचा परिणामस्वरूप त्यांच्या डाव्या मेंदूची हानी होऊन त्यांच्या शरिराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाला.

१ आ. अर्धांगवायू हा स्नायूंचा आजार नसून मेंदूचा आजार असणे : मेंदूचा आणि शरिरातील अवयवांचा संपर्क तुटल्यामुळे उजवा हात, उजवा पाय अन् तोंडाची उजवी बाजू यांची मेंदूला जाणीव नसल्याने त्यांची हालचाल बंद झाली. अर्धांगवायू हा स्नायूंचा आजार नसून मेंदूचा आजार आहे. त्यामुळे मेंदूचा ‘एम्.आर्.आय.’ किंवा ‘सीटी स्कॅन’ करायला सांगतात. हात किंवा पाय यांचा ‘एक्स्-रे’ (क्ष-किरण पडताळणी) काढायला सांगत नाहीत.

१ इ. रुग्णाला अर्धांगवायू झाल्यावर त्याच्यात पुढील ६ मासांत आणि त्यानंतरही काही प्रमाणात पालट होऊ शकणे : अर्धांगवायू झाल्यावर पहिले ६ मास रुग्णांसाठी सुवर्णकाळ असतो; कारण या कालावधीमध्ये रुग्णाला कोणतीही औषधे दिली नाही किंवा त्यांच्याकडून कोणतेही व्यायाम करवून घेतले नाहीत, तरी रुग्णामध्ये काही प्रमाणात पालट होतातच. ‘सहा मास झाल्यानंतर पालट होत नाहीत का ?’, असा प्रश्न पडू शकतो, तर सहा मासांनंतरसुद्धा पालट होऊ शकतो. केवळ पालट होण्याची गती न्यून असते. रुग्णाला आयुर्वेदीय औषधेही घ्यावी लागतात. ती मेंदूसाठी आणि स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी देतात.

१ ई. ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ म्हणजे काय ? : मेंदूतील पेशी जरी मृत झाल्या, तरी मेंदू त्याचे काम थांबवत नाही. मेंदूमध्ये नवीन ‘न्यूरॉन्स’ (विशिष्ट पेशी) बनत रहातात. चालणे आणि व्यायाम यांमुळे अधिक ‘न्यूरॉन्स’ बनतात. रुग्णाला चालता येत नसेल, तरी त्याला सतत काही दिवस चालवल्यास तो स्वतः चालायला लागतो. या प्रक्रियेला ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ (neuroplasticity) म्हणतात.

१ उ. हातांच्या तुलनेत पायांमधील सुधारणा जलद होणे : हात आणि पाय यांची तुलना केली, तर पायाची प्रगती जलद होते. रुग्ण लवकर चालायला लागतो. त्याला हात हालवायला वेळ लागतो. चालण्यासाठी दोन्ही पायांचा उपयोग करावा लागतो. रुग्ण चालायला लागल्यावर मेंदूला ‘दुसरा पायही आहे’, याची जाणीव होऊन तो चालायला लागतो. उजवा हात काम करत नसल्यास रुग्ण नियमितची कामे डाव्या हाताने करू लागतो. त्यामुळे मेंदूचे हाताकडे दुर्लक्ष होते.

२. यजमानांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. रुग्णसेवेच्या संदर्भात : मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन मास श्री. संजय यांना स्वतःला काहीच करता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सतत साहाय्य करावे लागायचे. त्या वेळी मला पुढील गोष्टी शिकायला मिळाल्या.

१. रुग्णाला एकटीनेच डायपर (मल-मूत्र शोषून घेण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) कसे लावायचे ?

२. रुग्णाच्या नाकातून घातलेल्या नळीने अन्ननलिकेत पातळ पदार्थ कसे द्यायचे ?

३. पलंगावरची चादर एकटीनेच कशी पालटायची ?

४. ‘बेडसोर्स’ (झोपून असलेल्या रुग्णाच्या त्वचेला होणार्‍या जखमा) म्हणजे काय ? त्यांची काळजी कशी घ्यायची ?

२ आ. अन्य सूत्रे

१. समाजातील विविध व्यक्तींशी समन्वय कसा करायचा ?

२. कठीण पीरस्थितीत आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीशी कसे बोलायचे ?

३. एका आधुनिक वैद्याने वैद्यकीय मार्गदर्शन केले, तरी त्या संदर्भात आणखी कुणाकडून अधिक माहिती मिळवू शकतो का, हे पहावे. त्यामुळे एकाच आधुनिक वैद्यांवर अवलंबून न रहाता अधिक योग्य माहिती मिळू शकते आणि योग्य उपचार करता येतात.

३. न्यूरोथेरपी आणि आयुर्वेदीय उपचार केल्यामुळे यजमानांच्या शारीरिक स्थितीत झालेली सुधारणा

श्री. संजय यांना झालेल्या अर्धांगवायूमुळे त्यांच्या स्नायूंमध्ये कडकपणा (‘स्पास्टिसिटी’ (spasticity)) आला असल्याने सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन त्यांच्यावर न्यूरोथेरपी करून घेतली. त्यामुळे त्यांच्या शरिरातील कडकपणा उणावला. त्यानंतर त्यांच्यावर चिपळूण येथील परशुराम रुग्णालयात आयुर्वेदीय उपचार केले. त्यामुळे त्यांच्या शरिरातील स्नायूंमधील शक्ती वाढल्याचे लक्षात आले.’

– सौ. समिधा पालशेतकर, देवद, पनवेल. (६.२.२०२१)

यजमान रुग्णाईत असतांना कुटुंबियांनी केलेले साहाय्य

१. ‘मी माझ्या सासूबाईंना (श्रीमती विमल पालशेतकर यांना) संजय यांना अर्धांगवायू झाल्याचे एक मासानंतर सांगितले. गुरुकृपेमुळे त्यांनी ती परिस्थिती शांत राहून स्वीकारली.

२. माझ्या दिरांनी (श्री. सुदेश पालशेतकर यांनी) मला पुष्कळ साहाय्य केले. ‘नातेवाइकांना ‘मला प्रतिदिन भ्रमणभाष करू नका’, असे सांगण्ो, आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी संपर्क करणे’ इत्यादींसाठी त्यांनी मला साहाय्य केले.

३. माझ्या वडिलांचे २ वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यांची उणीव माझ्या तीनही भावांनी (श्री. दादाराव हरिभाऊ भालेराव, गुलाबराव हरिभाऊ भालेराव आणि राजेंद्र हरिभाऊ भालेराव यांनी) भरून काढली. त्यांनी मला पुष्कळ मानसिक आणि आर्थिक साहाय्य केले. मला संजय यांना एकट्याने सोडून बाहेर जाता येणार नाही; म्हणून त्यांनी औषधे, डायपर आणि लागणारे अन्य साहित्य पाठवले.

‘देवाने मला आणि माझ्या यजमानांना शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अन् आर्थिक, अशा सर्वच स्तरांवर भरभरून साहाय्य केले. आम्हाला कुठे काहीच न्यून पडू दिले नाही’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. समिधा पालशेतकर, देवद, पनवेल. (६.२.२०२१)

रुग्णाला भेटायला जाणार्‍या व्यक्तींनी ‘रुग्णाची मनःस्थिती चांगली राहील’, याची काळजी घ्यावी !

‘रुग्णाला भेटायला जाण्यापूर्वी रुग्ण आणि त्याच्या जवळची काळजी घेणारी व्यक्ती यांची मनःस्थिती कशी आहे ?’, याविषयी इतरांकडून जाणून घ्यावे. रुग्णाची मनःस्थिती चांगली नसल्यास भेटायला गेलेल्या व्यक्तींना ‘नक्की काय बोलायचे ?’, हा प्रश्न पडू शकतो. अशा वेळी त्यांनी ‘रुग्णाला आनंद आणि प्रेरणा मिळेल’, अशा विषयावर बोलायला हवे. त्याच्या आवडीचे विषय किंवा सध्याच्या घडामोडी यांविषयीसुद्धा बोलू शकतो. ‘रुग्णाभोवतीचे वातावरण हलके-फुलके आणि आनंदी राहील’, अशा विषयांवरही बोलू शकतो.’

– सौ. समिधा पालशेतकर, देवद, पनवेल. (६.२.२०२१)