केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेसाठी ७९ टक्के रक्कम केवळ विज्ञापनांवर खर्च ! – संसदीय समितीच्या अहवालात माहिती

सरकारने आता कोणत्या योजनेविषयीच्या जागृतीसाठी विज्ञापनांवर किती खर्च केला पाहिजे, हेही ठरवणे आवश्यक आहे ! अन्यथा अशा योजनांचा मूळ उद्देश मागे पडू शकतो ! – संपादक

नवी देहली – ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेल्या ४४६ कोटी ७२ लाख रुपयांपैकी ७८.९१ टक्के रक्कम विज्ञापनांवर खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी माध्यमांमध्ये अभियान राबवणे समितीला आवश्यक वाटते’, असे संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे.

वर्ष २०१६-१७ मध्ये या योजनेवर अतिशय अल्प खर्च करण्यात आल्याचे लेखापरीक्षकांनी (‘कॅग’ने) म्हटले आहे. वर्ष २०१४-१५ आणि वर्ष २०१९-२० च्या कालावधीत राज्यांनी केवळ १५६ कोटी ४६ लाख रुपयांचा वापर केला. या कालावधीत केंद्र सरकारने राज्यांना ६५२ कोटी रुपये दिले होते; मात्र राज्यांनी केवळ २५.१३ टक्केच रक्कम वापरली, असे ‘कॅग’ने म्हटले आहे.