निरपेक्ष प्रीतीचे मूर्तीमंत रूप असलेल्या आणि स्वतःच्या आचरणातून ‘प्रत्येक प्रसंगात शिष्याने कसे वागायला हवे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

 वर्ष १९९८ मध्ये मुंबईतील सेवाकेंद्रात सेवा करत असतांना कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांच्याकडून साधिका सौ. जान्हवी शिंदे (पूर्वाश्रमीच्या कु. श्रुती शेलार) यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

१. परिश्रमपूर्वक चालू केलेल्या व्यवसायात जम बसत असतांना ‘देवच हवा’ या निर्धारामुळे व्यवसाय मैत्रिणीला हस्तांतरित करून पूर्णवेळ सेवा करण्याचा निर्णय घेणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

‘महाविद्यालयातील शिक्षण संपल्यावर कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) आणि त्यांची मैत्रीण यांनी व्यवसाय चालू केला. त्यासाठी दोघींनी पुष्कळ परिश्रम घेतले. त्यांचा व्यवसायात जम बसत होता आणि त्याच काळात सद्गुरु अनुताईंना साधनेविषयी समजले. तेव्हा त्या मुंबईतील सेवाकेंद्रात जाऊन सेवा करू लागल्या. काही दिवसांतच त्यांनी साधना करण्याचा निर्धार केला. त्यांनी व्यवसाय मैत्रिणीला हस्तांतरित केला आणि त्या पूर्णवेळ सेवा करू लागल्या. खरेतर व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांना प्रतिष्ठा आणि पुष्कळ पैसा मिळाला असता; पण ‘देवच हवा’, या निर्धारामुळे त्यांनी या सगळ्याचा त्याग केला.

२. साधकांवर निरपेक्ष प्रीतीकरणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

 २ अ. प्रेमळ आणि आनंदी स्वभाव : सद्गुरु अनुताई सर्व साधकांशी मोकळेपणाने वागतात. त्यांच्या प्रेमळ आणि आनंदी स्वभावामुळे त्या सर्वांना हव्याहव्याशा वाटतात.

२ आ. इतरांची काळजी घेणे : ‘कोणत्या साधकाला कोणता पदार्थ आवडतो ? कोणत्या साधकाला कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे ?’, हे लक्षात ठेवून त्या साधकांना ते देतात.

२ इ. इतरांच्या आवडीला प्राधान्य देणे : त्या स्वतःला मिळालेल्या चांगल्या वस्तूही साधकांना देतात. साधकांनी एक-दोन वेळा आम्हाला नवीन कपडे भेट म्हणून दिले होते. त्या वेळी त्यांनी प्रथम मला माझ्या आवडीचे कपडे निवडू दिले आणि नंतर राहिलेले त्यांनी घेतले. त्या खाऊच्या संदर्भातही असेच करायच्या.

२ ई. साधकांना प्रेमाने आधार देणे : माझ्या मनातील संघर्ष त्यांना सांगितल्यावर मला मिळणारे समाधान आणि त्यांचा वाटणारा आधार मी अनेक वेळा अनुभवला आहे. साधकांना समजून घेणे, प्रेमाने त्यांच्या पाठीवर किंवा डोक्यावरून हात फिरवून त्यांना धीर देणे आणि समस्यांवर आध्यात्मिक स्तरावर उपाय काढणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ! विशेष म्हणजे या प्रेमात कुठेच कृत्रिमपणा किंवा अपेक्षा नसे. मी रात्री अनेक वेळा घाबरून उठत असे. तेव्हा त्याही उठत आणि मी झोपेपर्यंत माझ्या शेजारी बसून रहात.

२ उ. सेवेत आणि अभ्यासात सर्वतोपरी साहाय्य करणे : मी महाविद्यालयात शिकत असतांना सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जात होते. वर्षाच्या शेवटी माझी बरीच चित्रे पूर्ण करायची राहिली होती. सद्गुरु अनुताईंनी दिवस-रात्र जागून अभ्यास पूर्ण करण्यास मला साहाय्य केले. मी महाविद्यालयात जातांनाही त्या मला सिद्धता करायला साहाय्य करायच्या. मी महाविद्यालयात गेल्यानंतर त्या विश्रांती घेत. ‘अभ्यासाचे विषय चांगले कसे करू शकतो ?’, याविषयी त्या मला सांगत. गुरुदेवही (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांच्या या गुणाचे कौतुक करून साधकांना शिकायला सांगत.

३. सेवेची तळमळ

सौ. जान्हवी शिंदे

३ अ. ‘सेवा चुकांविरहित आणि परिपूर्ण करायला हवी’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणीनुसार सेवा परिपूर्ण होण्यासाठी धडपड करणे : आरंभी सेवाकेंद्रात आम्हाला सनातनचे बॅनर (फलक) रंगवणे, ग्रंथांच्या मुखपृष्ठांची संकल्पना आणि त्याचे हाताने चित्र काढणे इत्यादी कलेसंबंधी सेवा असत. सद्गुरु अनुताई प्रत्येक सेवा पुष्कळ मन लावून करत. काही वेळा सेवा पूर्ण व्हायला रात्री जागावे लागे, तरीही त्या जिद्दीने सेवा पूर्ण करत. त्या प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा ठेवून सेवेतील बारकावे शिकून घेत. ‘चित्रांत चैतन्य येण्यासाठी ती चुकांविरहित आणि परिपूर्ण असायला हवीत’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणीनुसार सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्यांची धडपड असे.

३ आ. साधकांना सेवा शिकवणे : त्या स्वतःला येत असलेली एखादी कौशल्याची सेवा अन्य साधकांना शिकवत. त्या सुबक अक्षरे काढण्यात प्रवीण होत्या. त्या बॅनरवर अक्षरे काढून रंगवण्याची सेवा बारकाईने करत, तसेच इतरांकडूनही करवून घेत.

३ इ. चिकाटीने सेवेतील पालट करणे : सेवेत चैतन्य येण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर सेवेत अनेक पालट करायला सांगत. काही वेळा तर पूर्ण झालेल्या सेवेत पालट करायला लागून ती सेवा परत नव्याने करावी लागत असे. त्या वेळी सद्गुरु अनुताई न कंटाळता स्थिर राहून आणि अत्यंत चिकाटीने देवाला अपेक्षित अशी चैतन्यमयी सेवा करायचा प्रयत्न करत.

३ ई. ‘मानवाला सूक्ष्म-जगताचे ज्ञान व्हावे’, असा व्यापक विचार करून वाईट शक्तींची विविध रूपे रेखाटणे : आम्ही सेवा करतांना गुरुदेव सूक्ष्मातील अनेक प्रयोग करून घेत. त्या वेळी सद्गुरु अनुताईंची योग्य उत्तरे येत. त्यांना ‘आनंद’ आणि ‘शांती’ ही सूक्ष्म स्तरावरील दैवी स्पंदने कळत. त्यांना वाईट शक्तींची स्पंदने जाणवत. त्यामुळे त्यांना त्याविषयीचा अभ्यास करता आला. ‘मानवाला सूक्ष्म-जगताचे ज्ञान व्हावे’, असा व्यापक विचार करून त्यांनी वाईट शक्तींची विविध रूपे रेखाटली.

४. अनेक गुणांचा समुच्चयअसलेल्या अनुताईंचे संतांनी कौतुक करणे

सद्गुरु अनुताईंमध्ये आरंभीपासून साधकत्व आहे. त्यांच्यात प्रामाणिकपणा, कार्यकुशलता, चिकाटी, जिज्ञासा, संयम, तळमळ, क्षमाशीलता, संवेदनशीलता, भाव आदी अनेक गुण आहेत. सेवाकेंद्रात येणारे प.पू. जोशीबाबा, सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्यासारखे संत त्यांना प्रेमाने वागवत.

अ. एकदा एक ज्योतिषी सेवाकेंद्रात आले होते. त्यांनी सद्गुरु अनुताईंकडे पाहून त्यांच्यातील आध्यात्मिक वैशिष्ट्ये ओळखली. ते म्हणाले, ‘‘हिच्या डोळ्यांत काहीतरी आहे. पुढे लोक हिच्याकडे खेचले जातील. ती सर्वांना वेड लावेल !’’

आ. परात्पर गुरु डॉक्टर अनेक प्रसंगांत अनुताईंचे कौतुक करत. त्यांनी मला एकदा सांगितले, ‘‘अनु इतकी गुणी आहे की, नुसते तिच्यासारखे वागले, तरीही प्रगती होईल !’’

५. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेने त्यांचे तंतोतंत आज्ञापालन करून प्रत्येक प्रसंग साधनेला पूरक करवून घेऊन प्रगती करणे

सद्गुरु अनुताईंच्या साधनाप्रवासात अनेक चढ-उतार आले. त्या भावनाप्रधान असल्यामुळे प्रसंगांना सामोरे जाणे त्यांना फार कठीण व्हायचे. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेमुळे आणि त्यांचे तंतोतंत आज्ञापालन करून त्यांनी प्रत्येक प्रसंग साधनेला पूरक करवून घेऊन प्रगती केली.

६. उत्तम शिष्याप्रमाणे आदर्शवत् आचरण 

सद्गुरु अनुताईंनी स्वतःच्या आचरणातून ‘प्रत्येक प्रसंगात शिष्याने कसे वागायला हवे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवला आहे. व्यावहारिक इच्छांवर मात करण्याचा संघर्ष, नातेसंबंध, अनिष्ट शक्तींविरुद्धचा लढा, ईश्वराप्रती भक्तीभाव आणि सेवाभाव या सर्व प्रसंगांत त्यांचे आचरण शिष्याला शोभेल, असेच होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘नुसते तिच्यासारखे वागले, तरीही प्रगती होईल’, या वाक्याची मला पुनःपुन्हा आठवण होते.

सद्गुरु अनुताईंच्या साधनेच्या प्रवासातील काही घटना, गुरु-शिष्य नाते आणि सद्गुरु अनुताईंची प्रीती मला अनुभवता आली. यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.