श्री. श्रीनाथ श्रेष्ठी (यजमान), कुशालनगर, कोडगु, कर्नाटक.
१. चिकाटी
‘माझी पत्नी सौ. उमा कोणत्याही कामाला प्रारंभ केल्यावर ते काम चिकाटीने पूर्ण करते.
२. निरागसता
ती सर्वांशी लहान मुलांप्रमाणे निरागसतेने बोलते. ती ‘अन्य आपल्याविषयी काय म्हणतील ?’, असा विचार करत नाही.
३. तिला व्यवहार अथवा साधना यांविषयी कोणताही प्रश्न असल्यास ती त्याविषयी मला लगेच विचारते.
४. स्वतःला पालटण्याची तळमळ
एकदा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकांनी उमाला सांगितले, ‘‘तुम्ही मैत्रिणींशी अनावश्यक बोलणे आणि बाहेर जाणे न्यून करायला हवे.’’ त्याच दिवशी उमाच्या मैत्रिणीने तिला बाहेर जाण्यासाठी बोलावले. तेव्हा उमा मैत्रिणीसह बाहेर न जाता सेवेला गेली.’
कु. बांधव्या श्रीनाथ श्रेष्ठी (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. जवळीक साधणे
‘आई इतरांशी लवकर जुळवून घेते. रामनाथी आश्रमातील काही साधकांनी मला सांगितले, ‘‘तुझ्या आईला हिंदी बोलता येत नसूनही ती सर्वांशी बोलते. आम्ही त्यांच्याशी प्रथमच बोललो, तरीही ‘आम्ही नवीन साधिकेशी बोलत आहोत’, असे आम्हाला वाटले नाही.’’
२. कोणताही निर्णय घेतांना श्रीकृष्णाच्या चित्रासमोर चिठ्ठ्या टाकून त्यांतील एक चिठ्ठी उचलणे आणि त्यातील उत्तराप्रमाणे कृती करणे
मी लहान असतांना ‘मला कोणत्या शाळेत घालायचे ?’, याचा निर्णय घेण्याआधी आईने वेगवेगळ्या शाळांची नावे वेगवेगळ्या कागदांवर लिहून चिठ्ठ्या केल्या. तिने त्या चिठ्ठ्या श्रीकृष्णाच्या चित्रासमोर ठेवल्या. तिने प्रार्थना करून त्यांतील एक चिठ्ठी उचलली. नंतर तिने अन्य कोणताही विचार न करता त्या चिठ्ठीत ज्या शाळेचे नाव आले होते, त्या शाळेत मला घातले. ‘मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात पाठवायचे कि नाही ?’, याचाही निर्णय आईने याच पद्धतीने घेतला. आई व्यवहारातील निर्णयही अशाच प्रकारे घेते. ती त्याविषयी अन्य विचार करत नाही.
३. इतरांना साहाय्य करणे
आईकडे कुणीही साहाय्य मागितल्यास ती त्यांना साहाय्य करते. एकदा आमच्याकडे भांडी घासायला येणार्या बाईच्या घरी अडचण आल्यावर आईने तिच्या घरी जाऊन संबंधितांशी बोलून ती अडचण सोडवली. त्या वेळी आईला काही अडचणींना तोंड द्यावे लागले. तेव्हा माझी आजी रागावून आईला म्हणाली, ‘‘तू त्यांची अडचण सोडवायला का गेलीस ? आता तुलाच त्रास होत आहे.’’, तरीही आईने त्यांना साहाय्य केले.
४. ‘कुटुंबियांनी साधना करावी’, अशी तळमळ असणे
अ. आई प्रथमच रामनाथी आश्रमात आली असतांना मी तिचा परिचय माझे सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांच्याशी करून दिला. तेव्हा आईने त्यांना विचारले, ‘‘ही साधना कशी करत आहे ? तिला साधनेत साहाय्य करा.’’ ‘माझी साधना चांगल्या रितीने झाली पाहिजे’, अशी आईची तळमळ आहे.
आ. मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात पाठवतांना आमच्या काही नातेवाइकांनी आई-वडिलांना प्रश्न विचारले, ‘‘तिला आश्रमात का पाठवता ? ती पुढे शिकली नाही, तर ती पैसे कसे मिळवणार ?’’ तेव्हा आईने त्यांना सांगितले, ‘‘ते माझे दायित्व आहे. तिला साधनाच करू दे.’’
इ. आमचे उपाहारगृह आहे. ‘वडिलांना प्रसारसेवेला जाता यावे’, यासाठी आईने उपाहारगृहाचे दायित्व घेतले आहे. तिला तीव्र शारीरिक त्रास असूनही ती संध्याकाळी एकटीच उपाहारगृह सांभाळते. ‘मला साधना करता येत नाही, तर यजमानांची साधना तरी होऊ दे’, असा तिचा विचार असतो. आईला ‘स्वतःची साधना झाली पाहिजे’, यापेक्षा आमची (यजमान आणि मुले यांची) साधना झाली पाहिजे’, अशी तळमळ अधिक आहे.
५. एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे आईविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘त्यांच्यात साधनेची पुष्कळ तळमळ आहे. त्यांचा सर्व सेवांमध्ये चांगला सहभाग असतो.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.३.२०२०)