माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष होणार !

पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला

पुणे – कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने गोपनीय, तसेच इतर महत्त्वाची माहिती असल्याने पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मुंबईतील ‘सह्याद्री गेस्ट हाऊस’मध्ये १५ आणि १६ नोव्हेंबर या २ दिवशी साक्ष होणार आहे. शुक्ला यांच्यासह हर्षाली पोतदार, लक्ष्मी गौतम, बिपीन बिहारी यांचीही साक्ष १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत नोंदवली जाणार आहे.

हर्षाली पोतदार यांच्या निमंत्रणावर अलीगड मुस्लीम विद्यापिठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी परिषदेत सहभागी झाला होता. ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी शनिवारवाडा येथे झालेल्या परिषदेच्या आयोजनातही पोतदार सक्रीय होत्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही साक्षीकरता आयोगासमोर उपस्थित रहाण्याविषयी समन्स काढण्याच्या अर्जास कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने मान्यता दिली होती. कोरेगाव-भीमा येथे घटना घडली, तेव्हा परमबीर सिंह हे राज्याच्या कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते, तर रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या. त्यामुळे त्यांची साक्ष महत्त्वाची ठरणार असल्याने आयोगाने त्यांना उपस्थित रहाण्यासाठी समन्स काढण्याचा अर्ज संमत केला आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली.