रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि अहं न्यून असलेले गोवा येथील हृदयरोग तज्ञ (कै.) मंजुनाथ देसाई (वय ४५ वर्षे) !

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा शल्यविशारद डॉ. मंजुनाथ देसाई (वय ४५ वर्षे) यांचे २४.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील आधुनिक वैद्यांना आणि त्यांच्याकडे वैद्यकीय उपचार घेतलेल्या साधकांना अन् त्यांच्या नातेवाइकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. (डॉ.) मंजुनाथ देसाई

लेखक : आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. डॉ. मंजुनाथ देसाई सरकारी रुग्णालयात नोकरी करत असूनही ‘त्यांनी वेळ वाया न घालवता दिवसाचे दहा ते बारा घंटे काम करणे’, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटणे

‘डॉ. मंजुनाथ देसाई हे दिवसाचे १० ते १२ घंटे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काम करत होते. एखाद्या खासगी रुग्णालयातही कदाचित् एवढे काम करणारे कुणी नसेल; मात्र ‘डॉ. मंजुनाथ देसाई एका सरकारी रुग्णालयात अशा प्रकारे काम करत होते’, याचे सर्वांनाच पुष्कळ आश्चर्य वाटायचे. ते अनेक वेळा दुपारी जेवायलाही वेळेवर घरी जात नसत. ते क्वचित प्रसंगी रुग्णालयात डबा घेऊन यायचे आणि दुपारचा तेवढा वेळही वाचवायचे. ते अनेक वर्षांपासून दिवसाकाठी १० ते १२ रुग्णांची ‘अँन्जिओग्राफी’ करायचे.

डॉ. पांडुरंग मराठे

२. आधुनिक वैद्य (कै.) मंजुनाथ देसाई यांचा रुग्णांप्रतीचा वात्सल्यभाव

२ अ. प्रत्येक रुग्णाची जिव्हाळ्याने विचारपूस करणे : एकदा मी एका साधकाला डॉ. मंजुनाथ देसाई यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले होते. मी त्यांना तसे कळवले होते. डॉ. मंजुनाथ देसाई यांनी त्या साधकाला ‘थोड्या वेळात येतो’, असे सांगून ते त्यांच्या ‘कॅथ लॅब’मध्ये (‘अँन्जिओग्राफी’ किंवा ‘अँजिओप्लास्टी’ करायच्या कक्षामध्ये) गेले; परंतु त्यांना बाहेर यायला पुष्कळ वेळ लागला. बाहेर आल्यानंतर डॉ. मंजुनाथ देसाई यांनी त्या साधकाला शोधले; परंतु त्यांना ते साधक दिसले नाहीत; म्हणून त्यांनी मला लगेच भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘तुमचा रुग्ण येथे दिसत नाही.’’ डॉ. मंजुनाथ देसाई यांना यायला विलंब झाला; म्हणून साधक त्यांची वाट पाहून तेथून निघाले होते. ते प्रत्येक रुग्णाची जिव्हाळ्याने विचारपूस करणारे आधुनिक वैद्य होते.

२ आ. एका संतांना बसवलेल्या ‘पेसमेकर’ची चाचणी डॉ. मंजुनाथ देसाई यांनी स्वत: लक्ष घालून करणे : एका संतांच्या हृदयामध्ये एक ‘पेसमेकर’ (एक वैद्यकीय उपकरण) बसवला आहे. प्रति ६ मासांनी त्याची चाचणी करायची असते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे यंत्रही लागते. डॉ. मंजुनाथ यांनी त्या संतांच्या ‘पेसमेकर’ची चाचणी ३ वेळा स्वत: लक्ष घालून केली. त्या वेळी डॉ. मंजुनाथ स्वत: पुष्कळ व्यस्त असूनही वेळ काढून ते ‘टेक्निशियन’शी बोलून मला त्याविषयी कळवत असत.

२ इ. एखाद्या रुग्णाविषयी मनात काही प्रश्न किंवा शंका असतील, तर त्याचे उत्तरही डॉ. मंजुनाथ देसाई यांनी लगेच देणे : मी अनेक वेळा साधकांचे हृदय स्पंदन आलेख (ईसीजी) काढून त्यांना पाठवत असे. माझ्या मनात काही शंका किंवा प्रश्न असल्यास तेही त्यांना पाठवायचो. त्यांनी ‘ईसीजी’ पाहिल्यानंतर त्यांचे लगेच उत्तर यायचे. एखादे वेळी ते त्याच्या ‘कॅथ लॅब’मध्ये व्यस्त असतील, तर बाहेर आल्यानंतर ते मला भ्रमणभाष करून तसे कळवायचे.

२ ई. ‘साधकाच्या आजाराचे अहवाल पाहून अचूक निर्णय देणे’, यावरून ‘त्यांची निर्णयक्षमता किती चांगली होती’, ते लक्षात येणे : एकदा एका साधकाच्या छातीत दुखत होते; म्हणून त्यांना रात्री ११ वाजता एका खासगी रुग्णालयात पाठवले होते. तेथील आधुनिक वैद्यांनी त्या रुग्णाचा हृदय स्पंदन आलेख (ईसीजी) पाहून ‘लगेच ‘ॲन्जिओग्राफी’ करूया’, असा निर्णय दिला. त्या रात्री त्या रुग्णाची ‘ॲन्जिओग्राफी’ झाली नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी मी डॉ. मंजुनाथ यांच्याशी बोललो आणि त्या साधकाला खासगी रुग्णालयामधून अनुमती (डिस्चार्ज) घेऊन डॉ. मंजुनाथ यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्या साधकाचा हृदय स्पंदन आलेख (ईसीजी) आणि अन्य अहवाल पाहून सांगितले, ‘‘त्यांच्या हृदय स्पंदन आलेखामध्ये (ईसीजी) जो काही पालट आहे, तो त्यांच्या वयानुसार झालेला आहे. त्यांची ‘ॲन्जिओग्राफी’ करण्याची आवश्यकता नाही.’’ असा एक प्रसंग यापूर्वीही घडला होता. यावरून ‘त्यांची निर्णयक्षमता किती चांगली होती’, हे लक्षात आले.

२ उ. एका साधकाचे शस्त्रकर्म करण्यासाठी लागणारे एक महागडे उपकरण आणि साहित्य उपलब्ध करून घेणे : एका साधकाच्या पायातील रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ (Deep vein thrombosis) झाली होती आणि ती हळूहळू वरपर्यंत पसरली होती. अशा वेळी त्या गुठळीचा काही भाग हृदयापर्यंत जाऊन हृदय बंद पडू शकले असते. त्या रुग्णाचे शस्त्रकर्म करणे आवश्यक होते. माझे डॉ. मंजुनाथ यांच्याशी त्याविषयी बोलणे झाल्यानंतर ते म्हणाले, ‘‘आम्ही हे शस्त्रकर्म करू शकतो.’’ रुग्णाला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती केले. २ दिवसांनी डॉ. मंजुनाथ यांनी त्यांचे शस्त्रकर्म केले. शस्त्रकर्मासाठी लागणार्‍या एका उपकरणाचे मूल्य पुष्कळ अधिक होते. त्या वेळी आवश्यक साहित्यही उपलब्ध नव्हते. डॉ. मंजुनाथ यांनी साहित्य उपलब्ध करून घेतले आणि त्या रुग्णाचे शस्त्रकर्म केले.

२ ऊ. सुटीच्या दिवशी त्यांच्या आई-वडिलांकडे गेल्यावरही डॉ. मंजुनाथ यांनी रुग्णांचे अहवाल पहाणे : एकदा आश्रमातील एका साधकाची ‘ॲन्जिओग्राफी’ २ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी केली होती. दोन्ही आधुनिक वैद्यांचे मत वेगवेगळे होते. ‘अशा वेळी काय करायचे ?’, हे मला समजत नव्हते; म्हणून मी त्यांच्या ‘ॲन्जिओग्राफी’ची ‘सीडी’ मागवून घेतली आणि डॉ. मंजुनाथ यांच्या घरी जाऊन त्यांना दाखवली. तो रविवार, म्हणजे त्यांच्या सुटीचा दिवस होता. त्या वेळी डॉ. मंजुनाथ फोंडा, गोवा येथे रहाणार्‍या त्यांच्या आई-वडिलांकडे आले होते. मी तेथे गेल्यानंतर मला दिसले की, माझ्यासारखेच आणखी दोघे जण डॉ. मंजुनाथ यांना अहवाल (‘रिपोर्ट’) दाखवण्यासाठी आले होते. त्यांचे अहवाल पाहून झाल्यानंतर डॉ. मंजुनाथ यांनी मी नेलेली ‘सीडी’ त्यांच्या भ्रमणसंगणकात (लॅपटॉपमध्ये) घालून पाहिली. साधकाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेले अडथळे (‘ब्लॉकेजेस’) त्यांनी मला दाखवले आणि त्यांनी योग्य निर्णयही सांगितला.

३. लहान मुलांवर विशेष प्रेम असणारे डॉ. मंजुनाथ देसाई !

३ अ. डॉ. मंजुनाथ देसाई यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम असणे आणि जन्मत: हृदयविकार असणार्‍या मुलांसाठी त्यांनी आठवड्यातून एक दिवस वेळ देणे : डॉ. मंजुनाथ देसाई यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. ते आठवड्यातून एक दिवस जन्मत: हृदयविकार असणार्‍या मुलांना तपासत. ‘ओपीडी’त येणार्‍या ज्या मुलांना भरती (ॲडमिट) करायचे असेल, त्यांना ते विशिष्ट दिवशी बोलवायचे. ते प्रत्येक मुलाच्या वडिलांना वैयक्तिकरित्या आदल्या दिवशी दूरभाष करून दुसर्‍या दिवशी येण्याची आठवण करायचे. डॉ. मंजुनाथ यांनी स्वत:चा भ्रमणभाष क्रमांक मुलांच्या आई-वडिलांना दिला होता आणि त्यांना त्या क्रमांकावर कधीही भ्रमणभाष करण्याची अनुमती होती.

३ आ. पालकांना लहान मुलांना घेऊन आधुनिक वैद्यांना भेटायला विलंब झाल्यास वेळप्रसंगी डॉ. मंजुनाथ यांनी त्यांना जेवणासाठी पैसेही देणे : काही वेळा पालकांना लहान मुलांना घेऊन आधुनिक वैद्यांना भेटायला विलंब व्हायचा. अशा वेळी ते मुलांना आणि त्यांच्या पालकांना कधी उपाशी ठेवत नसत. ते मुले आणि त्यांचे पालक यांच्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करायचे. एकदा एका रुग्णाला घेऊन मी गेलो होतो. तेव्हा दुपारचे सव्वा दोन वाजले होते. त्या वेळी पुष्कळ लांबच्या तालुक्यातून एका मुलाला घेऊन त्याचे आई-वडील आले होते. ते डॉ. मंजुनाथ यांची वाट पहात थांबले होते. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर डॉ. मंजुनाथ यांनी त्यांना पैसे दिले आणि सांगितले, ‘‘प्रथम जेवून या. मी तुमच्या मुलाला तपासतो.’’

४. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील प.पू. दास महाराज, पू. मेनरायआजोबा यांसारख्या संतांना तपासण्याची संधी मिळाल्याने त्यांना संतसहवास लाभला.

५. भाव

५ अ. एका साधकाची ‘अँजिओप्लास्टी’ करण्यापूर्वी डॉ. मंजुनाथ देसाई यांनी ‘अँजिओप्लास्टी’ करीन; पण त्याला वाचवणे आपल्या हातात नाही’, असे सांगणे आणि नंतर ‘देवाची कृपा असून आता काही भीती नाही’, असे सांगणे : एका साधकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर काही वेळ त्याचे हृदय बंद पडले होते. आधुनिक वैद्यांच्या अथक प्रयत्नांती त्यांचे हृदय पुन्हा कार्यरत झाले; पण त्यांची ‘अँजिओप्लास्टी’ करून हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत करणे महत्त्वाचे होते. त्या साधकाची ‘अँजिओप्लास्टी’ करण्याची स्थिती नव्हती. त्यामुळे अनुमाने २ घंट्यांनंतर डॉ. मंजुनाथ देसाई यांनी त्याला ‘अँजिओप्लास्टी’ करण्यासाठी घेतले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मी त्यांची ‘अँजिओप्लास्टी’ करीन; पण त्यांना वाचवणे माझ्या हातात नाही. त्याविषयी मी काही सांगू शकत नाही.’’ त्या साधकाची ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यानंतर ते हसतमुखाने बाहेर आले आणि मला म्हणाले, ‘‘देवाची कृपा आहे. आता काही भीती नाही. ‘अँजिओप्लास्टी’ व्यवस्थित झाली आहे.’’

५ आ. मुलाच्या उपनयन संस्काराच्या वेळी ‘साधकाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवलेच आले आहेत’, या भावाने त्या साधकांना नमस्कार करणे : डॉ. मंजुनाथ यांच्या मुलाच्या उपनयन संस्काराला मी आणि माझी पत्नी सौ. मंगला गेलो होतो. आम्हाला पाहिल्यानंतर डॉ. मंजुनाथ यांना पुष्कळ आनंद झाला. आश्रमातून दिलेली भेटवस्तू आणि प्रसाद बटूला दिल्यानंतर डॉ. मंजुनाथ यांचा कृतज्ञतेचा भाव दाटून आला. त्यांनी लगेच मला नमस्कार केला. मी त्यांना ‘मला नमस्कार करू नका’, असे म्हणून थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु त्यांनी ऐकले नाही. ते म्हणाले, ‘‘तुम्ही आश्रमातून आला आहात, म्हणजे परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले आहेत’, असा भाव ठेवून मी तुम्हाला नमस्कार करतो.’’ त्यांचे बोलणे ऐकल्यावर माझी भावजागृती झाली.’ (१.११.२०२१)

लेखक : आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

१. डॉ. मंजुनाथ देसाई यांच्याकडे रुग्ण पाठवल्यावर त्यांनी त्या रुग्णाला पुढील उपचार सहजतेने मिळण्यासाठी साहाय्य करणे

‘एखादा हृदयविकाराचा रुग्ण डॉ. मंजुनाथ देसाई यांच्याकडे पुढील उपचारांसाठी पाठवतांना मी त्या रुग्णाच्या प्रकृतीचे केलेले निदान, तसेच पुढील उपचार आदी संदर्भात माझे मत असलेले पत्र देत होतो. तेव्हा डॉ. मंजुनाथ देसाई स्वत: त्या रुग्णाला पडताळत असत, तसेच त्यांचे मतही मला कळवून ‘पुढचे उपचार त्या रुग्णाला सहजतेने कसे मिळतील ?’, हे पहात असत.

२. डॉ. मंजुनाथ देसाई पुष्कळ उच्चशिक्षित असूनही त्यांच्यात अहं न्यून असणे

कधी हृदयरोगाच्या संदर्भात चांगला परिसंवाद (सेमिनार) असेल, तर ‘ते आम्हाला आवर्जून परिसंवादाला उपस्थित रहावे’, यासाठी निरोप पाठवत असत. डॉ. मंजुनाथ देसाई पुष्कळ उच्चशिक्षित असूनही त्यांच्याशी बोलतांना त्यांच्यात अहं न्यून असल्याचे लक्षात येत असे.’ (१.११.२०२१)

लेखक : श्री. सुधीश पुथलत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. सुधीष पुथलत

१. शांत आणि संयमी स्वभाव

डॉ. मंजुनाथ देसाई यांनीच माझी हृदय शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मी नियमितच्या तपासणीसाठी (चेकअपसाठी) जायचो. मी जायचो, तेव्हा प्रत्येक वेळी तपासणीसाठी २५ ते ३० रुग्ण आलेले असायचे. डॉ. मंजुनाथ २ शस्त्रक्रियांच्या मधल्या वेळेत या रुग्णांना भेटायचे. यातील काही रुग्ण डॉक्टरांची भेट होण्यासाठी पुष्कळ घाई-गडबड करायचे, तरीही डॉ. मंजुनाथ सर्व रुग्णांशी तेवढ्याच शांतपणे आणि संयमाने बोलून त्यांना तपासायचे. यातून त्यांचा शांत आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर राहून कर्तव्य करण्याचा स्वभाव जाणवायचा.

२. डॉ. मंजुनाथ यांच्याशी बोलल्यावर ‘एका श्रेष्ठ डॉक्टरांचा सल्ला मला मिळत आहे’, असे वाटणे आणि निश्चिंत रहाता येणे

मी त्यांच्याकडे ज्या ज्या वेळी तपासणीसाठी जायचो, त्या त्या वेळी त्यांनी सांगितलेली सूत्रे ऐकून आश्वस्त व्हायचो आणि ‘एका श्रेष्ठ डॉक्टरांचा सल्ला मला मिळत आहे’, असे वाटायचे अन् त्यांच्या सल्ल्यामुळे मी निश्चिंत व्हायचो. (३.११.२०२१)

यजमानांच्या शस्त्रकर्माच्या वेळी झालेल्या भेटीतून कै. (डॉ.) मंजुनाथ देसाई (हृदयरोग तज्ञ) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. विनय पानवळकर

१. ‘श्री. पानवळकर (यजमान) यांचे शस्त्रकर्म तातडीने का करावे लागत आहे ?’, याविषयी डॉ. मंजुनाथ देसाई यांनी संगणकावर दाखवून नीट समजावून सांगितल्याने मनावर आलेला ताण न्यून होणे

‘फेब्रुवारी २०१८ मध्ये माझे यजमान श्री. विनय पानवळकर यांची ‘अँजिओप्लास्टी’ करण्यासाठी आम्ही पणजी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेलो होतो. त्या वेळी आमची डॉ. मंजुनाथ देसाई यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यांनी ‘श्री. पानवळकर यांचे शस्त्रकर्म तातडीने का करावे लागत आहे आणि कशा प्रकारे करणार आहे ?’, याविषयी संगणकावर दाखवून मला आपुलकीने समजावले. त्यांनी दोन-तीन वेळा मला ‘काही काळजी करू नका. सर्वकाही व्यवस्थित होईल’, असे सांगून दिलासा दिला. त्यामुळे माझ्या मनावर आलेला ताण न्यून झाला.

२. यजमानांच्या शस्त्रकर्मानंतर हृदयरोग तज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांची भेट झाल्यानंतर त्यांनी ‘श्री. पानवळकर यांची प्रकृती चांगली आहे’, असे सांगणे

सौ. नेहा विनय पानवळकर

यजमानांचे शस्त्रकर्म झाल्यानंतर त्यांना तपासायला डॉ. मंजुनाथ देसाई आले असतांना त्यांची पुन्हा भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काकांची प्रकृती छान आहे.’’ यजमानांना घरी जाण्याची अनुमती मिळाल्यानंतर मी कागदपत्रांची पूर्तता करत होते. तेव्हा डॉ. मंजुनाथ देसाई माझ्याशी आस्थेने बोलले आणि त्यांनी यजमानांचे शस्त्रकर्म चांगले झाल्याचे पुन्हा सांगून मला निश्चिंत केले.

३. केवळ गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच चांगल्या आणि सात्त्विक हृदयरोग तज्ञांशी भेट होणे

या सर्व प्रसंगांतून डॉ. मंजुनाथ देसाई यांच्यातील ‘जवळीक साधणे, प्रेमभाव, दुसर्‍यांचे ऐकून घेणे आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण माझ्या लक्षात आले. ‘केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच सात्त्विक आणि मनमिळाऊ डॉ. देसाई यांच्याशी भेट झाली’, याची मला जाणीव झाली.

‘हिंदु राष्ट्रात अशीच रुग्णांची काळजी घेणारे सात्त्विक आधुनिक वैद्य असतील’, असे मला वाटले.’

– सौ. नेहा विनय पानवळकर, देवरुख, रत्नागिरी (१.११.२०२१)